काय सांगताय काय? इंडोनेशियातील शास्त्रज्ञ डेंग्युपासून बचावासाठी 'चांगले डास' विकसित करतायत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:28 PM2021-11-02T17:28:46+5:302021-11-02T17:32:48+5:30

डास आकाराने खूपच छोटे असले, तरी त्यांच्यामुळे किती मोठा उपद्रव होऊ शकतो, किती वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरू शकतात, पसरतात, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे; मात्र इंडोनेशियातले (Indonesia) शास्त्रज्ञ आता चक्क चांगले डास विकसित करत आहेत. डेंग्यूच्या (Dengue) नियंत्रणासाठी हे चांगले डास मदत करणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 

Indonesian researchers breed 'good' mosquitoes to combat dengue | काय सांगताय काय? इंडोनेशियातील शास्त्रज्ञ डेंग्युपासून बचावासाठी 'चांगले डास' विकसित करतायत

काय सांगताय काय? इंडोनेशियातील शास्त्रज्ञ डेंग्युपासून बचावासाठी 'चांगले डास' विकसित करतायत

Next

डास या शब्दाला 'चांगले' हे विशेषण लागू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच दिलं जाईल. कारण डास आकाराने खूपच छोटे असले, तरी त्यांच्यामुळे किती मोठा उपद्रव होऊ शकतो, किती वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरू शकतात, पसरतात, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे; मात्र इंडोनेशियातले (Indonesia) शास्त्रज्ञ आता चक्क चांगले डास विकसित करत आहेत. डेंग्यूच्या (Dengue) नियंत्रणासाठी हे चांगले डास मदत करणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दशकांत जगभरात डेंग्यूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे जगभरातल्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला डेंग्यूच्या संसर्गाचा धोका आहे. डेंग्यू हा विषाणूजन्य रोग (Viral Disease) असल्याने त्यावर अद्याप प्रभावी लस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रतिबंध (dengue Prevention) हाच महत्त्वाचा उपचार आहे. डासांच्या माध्यमातून डेंग्यूचा प्रसार होत असल्याने डासांचं नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे. वर्ल्ड मॉस्क्युटो प्रोग्राम हा ना नफा तत्त्वावर चालणारा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत वर उल्लेख केलेलं हे संशोधन सुरू आहे. वल्बाचिया नावाचा एक सर्वसामान्य बॅक्टेरिया अर्थात जिवाणू नैसर्गिकरीत्या ६० टक्के कीटक प्रजातींमध्ये आढळतो. त्यात ड्रॅगनफ्लाइज, फुलपाखरं, फळमाश्या आणि काही प्रकारच्या डासांचा समावेश असतो; मात्र एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमध्ये मात्र हा बॅक्टेरिया आढळत नाही. एडिस डास डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत असतात. वल्बाचिया नावाचा बॅक्टेरिया डेंग्यूसाठी कारणीभूत असलेल्या विषाणूच्या वाढीला प्रतिबंध करू शकतो, असं शास्त्रज्ञांना आढळलं आहे.

वर्ल्ड मॉस्क्युटो प्रोग्रामअंतर्गत कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ पुरवंती यांनी सांगितलं, की आम्ही सैद्धांतिकदृष्ट्या चांगले डास (Good Mosquitoes) विकसित करत आहोत. डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांसोबत वल्बाचिया बॅक्टेरियांचं वहन करणारे डास मिसळले गेले, तर त्यातून चांगले डास अर्थात वल्बाचिया डासांची पैदास होईल.

हे डास माणसांना चावले, तरी त्यातून रोगप्रसारासारखे दुष्परिणाम होणार नाहीत. २०१७ पासून ऑस्ट्रेलियातलं मोनाश विद्यापीठ आणि इंडोनेशियातलं गडजाह माडा विद्यापीठ येथे वर्ल्ड मॉस्क्युटो उपक्रमांतर्गत (World Mosquito Programme) संयुक्तरीत्या एक संशोधन करण्यात आलं. त्यादरम्यान, लॅबमध्ये विकसित केलेले वल्बाचिया बॅक्टेरिया (Vulbachia Bacteria) असलेले डास सोडण्यात आले. त्यानंतर केलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं, की यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ७७ टक्के आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागणाऱ्या रुग्णसंख्येत 86 टक्के घट नोंदवली गेली आहे. जूनमध्ये न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनतर्फे हे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले होते.

Web Title: Indonesian researchers breed 'good' mosquitoes to combat dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.