हे मसाले तब्येतीने खाल, तर स्वत:ची तब्येत बिघडवाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 12:08 IST2024-08-20T12:07:22+5:302024-08-20T12:08:38+5:30
प्राधिकरणाच्या तपासणीत ४७४ नमुने नापास

हे मसाले तब्येतीने खाल, तर स्वत:ची तब्येत बिघडवाल...
नवी दिल्ली : देशात विकले जाणारे १२ टक्के मसाले गुणवत्ता व सुरक्षा मानकांची पूर्तता करीत नसल्याचे भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.
प्राधिकरणाने देशातील ४,०५४ नमुन्यांची तपासणी केली, त्यातील ४७४ नमुने खाण्यायोग्य नसल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या माहितीनुसार, गुणवत्ता व सुरक्षा मानकावर नापास झालेल्या मसाल्यांच्या कंपन्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे.
देशातील आघाडीच्या मसाले उत्पादक कंपन्या एमडीएच आणि एव्हरेस्ट यांनी आपले मसाले सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.
बंदीनंतर तपासणीचे आदेश
मे ते जुलै २०२४ या कालावधीत प्राधिकरणाने मसाल्यांची तपासणी केली. माहिती अधिकाराच्या एका अर्जावर सरकारने या तपासणीतील निष्कर्षाची माहिती दिली. एप्रिल-मे २०२४ मध्ये सिंगापूर आणि हाँगकाँग येथे भारतीय मसाल्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सरकारने मसाल्यांच्या तपासणीचे आदेश दिले होते.