Why Indians Get Heart Attacks Early: भारतामध्ये हृदयाशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही समस्या आता पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतीयांना भेडसावत आहे. तज्ज्ञांच्या मते, यामागील एक प्रमुख कारण म्हणजे रक्तातील वाढलेले एलडीएल (LDL), म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल.
कमी कोलेस्ट्रॉलही ठरू शकतो धोकादायक
हृदयरोगतज्ज्ञ सांगतात की, भारतीयांमध्ये हृदयविकार कमी कोलेस्ट्रॉल पातळीवरही सुरू होऊ शकतात. जे कोलेस्ट्रॉल लेव्हल पाश्चात्त्य देशांमध्ये ‘मध्यम’ मानले जाते, तेच स्तर भारतात धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मापदंड थेट भारतीय लोकसंख्येला लागू करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ज्ञ काय सांगतात?
तज्ज्ञांच्या मते, भारतीयांची जनुकीय रचना (Genetic Make-up) हा यामागील एक महत्त्वाचा घटक आहे. शरीरातील चरबी व साखर प्रक्रिया करण्याची पद्धत, काही आनुवंशिक गुणधर्म आणि पोटाभोवती चरबी साठण्याची प्रवृत्ती...या कारणांमुळे भारतीय लोक लहान वयातच हृदयविकारांना अधिक संवेदनशील ठरतात. अनेक अभ्यासांनुसार, भारतीयांमध्ये धमन्यांतील ब्लॉकेज आणि हृदयविकार पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत सुमारे 10 वर्षे आधी विकसित होतात.
जीवनशैलीही ठरते तितकीच जबाबदार
फक्त जेनेटिक्सलाच दोष देता येणार नाही. आजची बदललेली जीवनशैली हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. जंक फूड, फास्ट फूड आणि गोड पदार्थांचे वाढते सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव ताणतणावपूर्ण जीवनशैली आणि वाढते वजन...या सगळ्यामुळे एलडीएल (खराब कोलेस्ट्रॉल) वाढतो आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) कमी होते. एचडीएलचे काम रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी साफ करणे असते. जेव्हा खराब कोलेस्ट्रॉल वाढतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल कमी होतो, तेव्हा हार्ट अटॅकचा धोका अनेक पटींनी वाढतो.
लक्षणे न दिसणे हीच मोठी अडचण
कोलेस्ट्रॉलची सर्वात धोकादायक बाब म्हणजे त्याची कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत. बहुतेक वेळा लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलबद्दल तेव्हाच कळते, जेव्हा छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास किंवा थेट हार्ट अटॅक येतो. याच कारणामुळे नियमित आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक ठरते, विशेषतः 30 वर्षांवरील व्यक्तींनी आणि ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे त्यांनी.
कसा कराल बचाव?
- हृदय निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात.
- संतुलित व हृदयस्नेही आहार घ्या( फळे, भाज्या, साबुत धान्य, लीन प्रोटीन)
- दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम
- प्रोसेस्ड फूड आणि गोड पेय टाळा
- वजन नियंत्रणात ठेवा
- ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा छंद जोपासा
या सवयींमुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
Web Summary : India faces a rising heart disease risk, with alarming early heart attack rates. Key factors include genetics, lifestyle, and high LDL cholesterol. Experts recommend regular checkups, balanced diets, and exercise to mitigate the risk.
Web Summary : भारत में हृदय रोग का खतरा बढ़ रहा है, कम उम्र में हार्ट अटैक चिंताजनक है। मुख्य कारकों में आनुवंशिकी, जीवनशैली और उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल शामिल हैं। विशेषज्ञ जोखिम को कम करने के लिए नियमित जांच, संतुलित आहार और व्यायाम की सलाह देते हैं।