Health Tips : Some tips to help you take care of new born baby from day one | पहिल्या दिवसापासूनच आपल्या बाळाची सौम्यपणे काळजी घेण्यासाठी उपयोगी पडतील 'या' टिप्स

पहिल्या दिवसापासूनच आपल्या बाळाची सौम्यपणे काळजी घेण्यासाठी उपयोगी पडतील 'या' टिप्स

पालक आपल्या नवजात बाळाला प्रेमाने आणि काळजीपूर्वक प्रथम स्पर्श करतात, तेव्हा त्यांच्यात एक बंध निर्माण होतो. बाळाच्या दररोजच्या नित्यक्रमामध्ये त्याच्या त्वचेची काळजी घेणे व तिचे संरक्षण करणे यांची नितांत आवश्यकता असते. या लहानग्यांची त्वचा प्रौढांच्या त्वचेपेक्षा सुमारे 20 ते 30 टक्के पातळ असते आणि ती सहजपणे खरचटली जाऊ शकते. म्हणूनच, योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, कारण निरोगी त्वचा ही बाळाच्या निरोगी विकासास हातभार लावते.

नवजात शिशूंची काळजी घेण्याविषयीच्या या सप्ताहात ‘जॉन्सन अँड जॉन्सन कन्झ्युमर हेल्थ इंडिया’च्या ‘जनरल मेडिकल अफेअर्स मॅनेजर’ डॉ. प्रीती ठाकोर यांनी नवजात शिशूंच्या सर्वांगीण विकासास मदत करू शकेल, अशा त्वचेची काळजी घेण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहिती दिली आहे.

स्पर्शाचा प्रभाव

नवजात बाळाला होणारा स्पर्श ही त्याची पहिली भाषा असल्याचे म्हटले जाते. बाळाशी संवाद साधण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याला शक्यतो लवकर आणि अखंडपणे स्पर्श केल्यास, ते त्याच्या एकंदर हिताचे ठरते. बाळाचा जन्म झाल्यावर लगेचच त्याला कवटाळून धरल्यास, त्याचे स्तनपान करण्यात मदत होते. असे सतत बिलगून राहिल्यामुळे बाळाच्या मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आकलनविषयक विकासास मदत होते.

बाळाला मालिश आवश्यक

बाळाला मालिश करणे हा त्याच्याशी निर्माण झालेले बंध बळकट करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. नियमितपणे मालिश केल्याने बाळाचे आपल्या पालकांशी चांगले संबंध निर्माण होतात व त्याच्या सुखी आणि निरोगी विकासासाठी त्यातून मोठी मदत मिळते. बाळाच्या संपूर्ण शरिरावर लक्ष केंद्रीत करून त्याला सौम्य आणि सकारात्मक पद्धतींनी मालिश केले पाहिजे.

या मालिशसाठी वैद्यकीयदृष्ट्या सौम्य असल्याचे सिद्ध झालेले व नवजात शिशूच्या त्वचेसाठी योग्य ठरणारे तेल वापरावे. हे तेल बाळाच्या अंगात लगेच मुरणारे असावे आणि त्याच्या त्वचेला ओलावा देणारे, मऊ करणारे घटक त्यात असावेत. बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक तेलांच्या वापरास प्राधान्य देण्यात यावे. वनस्पती तेल, खोबरेल तेल आणि कापसाच्या बियांचा अर्क यांचे मिश्रण या ठिकाणी आदर्शवत ठरेल; कारण ते ‘व्हिटॅमिन इ’ने समृद्ध असते आणि बाळाच्या नाजूक त्वचेसाठी ते फायदेशीर ठरते.

बाळाचे स्नान हा एक मजेदार अनुभव

आपल्या बाळासोबत व्यग्र राहण्यासाठी त्याच्या स्नानाची वेळ ही दिवसातील सर्वात योग्य वेळ मानायला हवी. नवीन वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे, की विविध इंद्रियांमधून बाळाला जे अनुभव मिळतात, ते बाळाच्या मेंदूची वाढ होण्यास अतिशय महत्त्वाचे असतात. हे अनुभव बाळाला आंघोळीच्या वेळेस चांगल्या प्रकारे मिळू शकतात. त्याला त्यावेळी स्पर्श, दृष्टी, गंध आणि आवाज हे एकाच वेळी उत्तेजित करतात. बाळाशी बोलणे, त्याला आंघोळ कशी चालली आहे हे समजावून सांगणे, त्याच्याकडे पाहून स्मित करणे आणि त्याच्याशी खेळणे यातून ही आंघोळीची कृती एकूणच मजेशीर बनते. 

बाळाच्या संवेदनशील त्वचेचे संरक्षण करण्याकरीता आंघोळीसाठीची उत्पादने योग्य प्रकारची निवडणे महत्वाचे आहे. यासाठी अल्ट्रा-लाइट वॉश वापरण्याची शिफारस केली जाते.  या वॉशमुळे त्याच्या त्वचेला त्रास होत नाही. तो शरीरावरून लवकर निघून जाण्यासारखा बनवलेला असतो. हा वॉश वैद्यकीयदृष्ट्या सौम्य असल्याचे सिद्ध झालेले असावे आणि अॅलर्जी होणार नाही, अशा विशिष्ट घटकांपासून तो बनविलेला असावा. 

वेळोवेळी बदलावेत डायपर

नवीन बाळाची त्वचा अद्याप विकसित होत असते आणि बाहेरच्या जगाशी जुळवून घेण्यासाठी त्याला वेळ हवा असतो. या काळात त्याच्या त्वचेवर पुरळ उठणे, मुरुम येणे, डायपरची रॅश उमटणे असे त्रास होऊ शकतात. अशावेळी योग्य ती बेबी स्कीनकेअर उत्पादने वापरणे योग्य ठरते. उदाहरणार्थ, बाळाचे डायपर वेळोवेळी बदलून त्याच्या त्वचेवर येणारे रॅश टाळता येतात. ओल्या डायपरसह बाळ बराच काळ राहिले, तर त्याच्या त्वचेवर पुरळ होईल आणि बाळ अस्वस्थ होईल. बाळाची डायपरची जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी. ती अजिबात घासली न जाता अलगदपणे पुसून घ्यावी. याकरीता बेबी वाईप्स किंवा मऊ कापड व पाणी यांचा वापर करून डायपरची जागा स्वच्छ करावी.

बाळाची त्वचा ओलसर ठेवा

बाळाची त्वचा नियमितपणे ओलसर करणे महत्वाचे आहे. नवजात शिशूंची त्वचा सोलली जाणे आणि ती कोरडी पडणे अशी स्थिती सामान्यतः आढळते. म्हणूनच बाळाच्या त्वचेचे हायड्रेशन आवश्यक आहे. नवजात शिशूच्या संवेदनशील त्वचेसाठी खास तयार केलेले आणि चिकट नसलेले क्रीम वापरण्याची शिफारस सामान्यतः करण्यात येते. बाळाच्या त्वचेचे पीएच संतुलित प्रमाणात राखणारे एखादे लोशनही वापरता येऊ शकते. त्यातून त्याच्या त्वचेवर त्वरीत ओलावा निर्माण होऊन तो 24 तास राहू शकेल. बाळाला आंघोळ घातल्यावर लगेच लोशन किंवा क्रीम वापरणे चांगले असते. अर्थात ते इतर वेळीही लावता येते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health Tips : Some tips to help you take care of new born baby from day one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.