व्यायामातही, अति तिथे माती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:54 IST2025-10-06T10:54:25+5:302025-10-06T10:54:38+5:30
आपण उत्तम व्यायाम केला पाहिजे. फिटनेस राखला पाहिजे आणि सक्रिय राहायला हवे, असे आपल्याला नेहेमीच सांगितले जाते; पण यामुळे काही लोक विनाकारण अतिरिक्त प्रेरणा घेतात आणि अधिकाधिक व्यायाम करू लागतात.

व्यायामातही, अति तिथे माती!
- अर्जुन विर्दी
फिटनेस कोच
शरीरासाठी व्यायाम आवश्यकच. पण तो किती करावा, हे आपणच आपल्या गरजेनुसार, क्षमतेनुसार ठरवावे. कोणतीही गोष्ट अति केली तर ती त्रासदायकच. व्यायामालाही ते तत्त्व लागू होते. त्यामुळे व्यायाम करताना काही दक्षताही घेणे क्रमप्राप्त
ठरते.
आपण उत्तम व्यायाम केला पाहिजे. फिटनेस राखला पाहिजे आणि सक्रिय राहायला हवे, असे आपल्याला नेहेमीच सांगितले जाते; पण यामुळे काही लोक विनाकारण अतिरिक्त प्रेरणा घेतात आणि अधिकाधिक व्यायाम करू लागतात. गरजेपेक्षा जास्त मोठी उद्दिष्टे हे लोक निश्चित करतात आणि मग ती उद्दिष्टे गाठण्यासाठी अधिक परिश्रम करतात. निरोगी आयुष्यासाठी व्यायाम करायलाच हवा; पण तो करताना कधी थांबावे अन् किती थांबावे हेदेखील माहिती असणे गरजेचे आहे.
आरामाशिवाय व्यायाम नको
योग्य आरामाशिवाय व्यायाम करणे म्हणजे डोंगर उतारावरून सायकल चालवताना नियंत्रण गमावण्यासारखे आहे. परिणामी, ‘अति तिथे माती’ एवढेच हाती लागू शकते. जेव्हा- जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळी आपल्या शरीरातील स्नायूंची काही प्रमाणात झीज होते. त्यामुळे जेव्हा आपण योग्य प्रमाणात आराम करतो, त्यावेळी या स्नायूंची झीज भरून येते, तसेच ते अधिक सुदृढ होण्यास मदत होते. याचा परिणाम असा होतो की, पुढच्यावेळी तोच व्यायाम प्रकार तुम्ही अधिक सहजतेने करू शकता. त्यामुळे व्यायाम करताना दोन पावले पुढे अन् चार पावले मागे, या तत्त्वाचा अवलंब करायला हवा.
शरीराचे संकेत ओळखा...
मोठ्या स्पर्धांत भाग घेणारे ॲथलेट इतका व्यायाम करूनही स्वतःला नियंत्रणात कसे ठेवतात? असा प्रश्न आपल्याला पडला असेल; पण त्यांचा व्यायाम, स्पर्धा लक्षात घेता त्यांच्या जीवनशैलीचे एक सुयोग्य नियोजन केलेले असते.
त्यांचा व्यायाम, पोषण मूल्य, मसाज, कोल्ड आइस बाथ, स्ट्रेचिंग, फोम रोलिंग आणि योग्य प्रमाणात व्यायाम, अशा सर्व गोष्टी नियंत्रित असतात. ते सक्रिय आराम करीत असतात. योग्य त्यावेळी कमी क्षमतेचे व्यायाम करण्यावरही भर देतात. मात्र, आपल्यासारख्यां लोकांना वेळ किंवा पैशांअभावी त्यांच्यासारखी जीवनशैली परवडतेच, असे नाही.
आपल्यासारख्यांनी व्यायाम, झोप आणि जेवण, हे योग्य प्रमाणात केले पाहिजे. व्यायाम अतिरिक्त झाला, तर त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीर आपल्याला योग्य ते संकेत देत राहते. हे संकेत वेळीच ओळखावेत. त्यानुसार योग्य प्रमाणात आरामही गरजेचा आहे. आपण कधी ब्रेक घ्यायला हवा, याचे काही आडाखे आहेत.
कुठे थांबायचे ते कळायला हवे
तुम्ही ॲथलिट असा किंवा नियमित व्यायाम करणारे असा, शरीरारास योग्य प्रमाणात आराम देणे नितांत गरजेचे आहे. केवळ आराम नाही, तर योग्य प्रमाणात जेवण व पाणी प्राशनाकडेदेखील लक्ष देण्याची गरज आहे. काही वेळा पोहणे, चालणे किंवा योगा करणे, असे कमी श्रमाचे व्यायामदेखील करता येऊ शकतात. त्यामुळेच लक्षात ठेवा, ज्याला कुठे थांबायचे ते कळते, तोच खरा ॲथलिट असतो.
विश्रांतीविना व्यायामाचे दुष्परिणाम
मूड खराब असणे : प्रत्येक दिवस चांगलाच असतो, असे नाही. एखाद्या दिवशी मन:स्थिती बिघडण्यासारख्या गोष्टीदेखील घडतात. त्यावेळी तुम्हाला ब्रेक घेत आराम करण्याची वेळ आली आहे.
कार्यक्षमता घटणे : तुमच्या कामात सातत्य असूनही जर तुमची कार्यक्षमता घटली, असे वाटत असेल, तर ही आराम करण्याची वेळ आहे.
झोप न येणे : तुम्ही अतिशय दमला असाल आणि तरीही झोप येत नसेल, तर तुमचे काहीतरी बिघडले आहे, असे समजावे.
आजारी पडणे : अति व्यायामामुळे तुमच्या पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो. त्यामुळे माणूस वरचेवर आजारीदेखील पडतो.
थकवा : सतत थकल्यासारखे वाटणे. एखाद्या परिश्रमामुळे येणारा थकवा एखाद- दोन दिवसांत जातो; पण सातत्याने थकवा येणे हेदेखील शरीराचे तंत्र बिघडल्याचे संकेत आहेत.
इजा होणे : शरीराला जर योग्य प्रमाणात आराम मिळाला नाही, तर थकलेल्या स्नायूंना अति व्यायामामुळे इजा होण्याची शक्यता असते.