CoronaVirus News : दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 07:29 IST2020-07-13T07:28:56+5:302020-07-13T07:29:23+5:30
रोज दोन वेळा वाफ घेण्याचा अजून एक दुष्परिणाम असा होऊ शकतो की ही वाफ वाफेच्या मशीनमधून घेत असतील तर घरात प्रत्येकासाठी वेगळे वाफेचे मशीन असणे अशक्य आहे.

CoronaVirus News : दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज
- अमोल अन्नदाते
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)
सध्या दोन वेळा वाफ घेतल्याने तसेच जास्त धोका असल्यास दर दोन तासांनी वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो, असा संदेश मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. पण हा गैरसमज असून दोन वेळा वाफ घेतल्याने कोरोनाला प्रतिबंध होतो, याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. यावर करायला काय हरकत आहे, फायदा झाला नाही तरी तोटा होणार नाही, अशी अनेकांची भावना असते.
पण असा विचार करून चालणार नाही. म्हणून आपण कुठलाही प्रतिबंधक उपाय स्वीकारताना तसेच समाज माध्यमांवर फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्य- असत्यता पडताळून पाहावी. अशा खोट्या प्रतिबंधक उपायांचे काही तोटे असतात. एक तर अशा निरुपयोगी उपायांमुळे उपयोगाच्या प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होते. तसेच यामुळे सुरक्षेची खोटी भावना निर्माण होते. तसेच यात कमी खर्च असला तरी या जेव्हा सार्वजनिक पातळीवर अनेक जण हे उपाय स्वीकारतात त्यात एकत्रित राष्ट्रीय व नैसर्गिक संपत्तीचा नाहक अपव्यय होतो.
रोज दोन वेळा वाफ घेण्याचा अजून एक दुष्परिणाम असा होऊ शकतो की ही वाफ वाफेच्या मशीनमधून घेत असतील तर घरात प्रत्येकासाठी वेगळे वाफेचे मशीन असणे अशक्य आहे. म्हणून सगळ्यांनी एकच मशीन वापरून कोणाला लक्षणविरहीत संसर्ग असल्यास त्यातून इतरांना संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच एक मीटरपेक्षा जास्त अंतर राखून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे, शक्य तिथे सॅनिटायझरचा वापर व कामासाठी व आवश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडणे या मुलभूत प्रतिबंधक उपायांपासून विचलित होऊ नये.