पालकांनो, मुलांची काळजी घ्या! कोरोनाग्रस्त लहानग्यांना आता कावासकीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:24 AM2020-06-30T04:24:20+5:302020-06-30T07:07:48+5:30

वेळीच लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घ्या!

Coronary infants at risk of kawasaki; Be careful | पालकांनो, मुलांची काळजी घ्या! कोरोनाग्रस्त लहानग्यांना आता कावासकीचा धोका

पालकांनो, मुलांची काळजी घ्या! कोरोनाग्रस्त लहानग्यांना आता कावासकीचा धोका

Next

मुंबई: सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूला लढा देत आहे. या दरम्यान आता अनेक देशात विविध आजार उद्भवत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता लहान मुलांमध्ये कोरोना विषाणूची वेगळी लक्षणे दिसू लागली आहेत. त्यातच आता कोरोनानंतर कावासकी आजारानेही चिमुरड्यांना विळखा घातला आहे. त्यामुळे येत्या काळात लहानग्यांच्या आरोग्याकडे अधिक सजगपणे पालकांनी लक्ष देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. राज्यात साडेपाच हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, यापैकी ६० टक्के रुग्णांना या आजाराशी साधर्म्य असणारी लक्षणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

सर्दी, ताप, खोकला, थकवा, चव न कळणे आणि वास न येणे, ही लक्षणे दिसली की कोरोनाची भीती लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाढते. पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जर जीभ लाल होणे, शरीरावर लाल चट्टे, ताप आणि पोटात-छातीत प्रचंड वेदना होत असतील तर त्वरित रुग्णालय गाठा. कावासकी आजारातील ही लक्षणे कोरोनाग्रस्त लहान मुलांमध्ये दिसत असल्याने आता चिंता वाढली आहे. साडेपाच हजारांहून अधिक बालकांना कोरोनाची लागण झाली आहे, यात बऱ्याच लहानग्यांना कावासकी आजाराशी साधर्म्य असणारी लक्षणे आहेत, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. गिरीजा सहानी यांनी दिली.

कोरोनाची लागण झालेल्या अनेक लहान मुलांमध्ये ही लक्षणे दिसत असल्याची माहिती सायन रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. आकाश पाटील यांनी दिली आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना कावासकी आजार होतो. तर हा आजार नवीन नसून ५० वर्षे जुना आजार आहे. देशात वर्षाला या आजाराचे दोन-तीन रुग्ण आढळतात. कावासकी विषाणू मुलांच्या थेट हृदयात प्रवेश करत स्नायूंवर हल्ला करतो. त्यामुळे मुलांची प्रकृती गंभीर होते. त्यामुळे वेळेत मुलांना उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पण मुंबईत मात्र आता याच आजाराची लक्षणे कोरोनाग्रस्त मुलांमध्ये दिसू लागली आहेत. हा कावासकी आजारच आहे असे आताच म्हणता येत नाही. पण कावासकीसारखी लक्षणे अर्थात जीभ लाल होणे, शरीरावर लाल चट्टे, प्रचंड ताप, छातीत दुखणे अशी लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये आहेत, असेही
डॉ. पाटील म्हणाले. याखेरीज, वाडिया रुग्णालयातही पाच कोरोनाबाधित बालकांना कावासकीसारखी लक्षणे आढळली आहेत. यातील चार जणांना घरी सोडले असून एकावर उपचार सुरू आहेत. ही बालके पाच ते आठ वयोगटातील असून तर एक रुग्ण १४ वर्षीय असल्याचे वाडिया रुग्णालयाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव
जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला ‘मल्टिसिस्टम इन्फ्लामॅटरी सिन्ड्रोम’ असे नाव दिले आहे. मुंबई, चेन्नई आणि केरळमध्येही काही बालकांमध्ये ही लक्षणे आढळली आहेत. साधारणपणे बाधा झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यांनंतर ही लक्षणे दिसून येतात. या आजारात रक्तदाब कमी झाल्याने हृदयाला होणारा रक्तपुरवठा करणाºया धमन्यांना अपाय होण्याची शक्यता असते. परिणामी काही वेळेस अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव असतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यानंतर तातडीने रुग्णाला जवळच्या रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronary infants at risk of kawasaki; Be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app