मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:40 IST2025-10-17T07:39:48+5:302025-10-17T07:40:11+5:30
Kidney Transplant: सध्या रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणारी किडनी मिळणे आवश्यक असते, ज्यामुळे 'ओ' रक्तगटाच्या रुग्णांना सर्वाधिक काळ प्रतीक्षा करावी लागते.

मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
व्हँकूव्हर/बीजिंग: वैद्यकीय आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. कॅनडा आणि चीनमधील संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या एका चमूने एक अशी 'युनिव्हर्सल किडनी' तयार केली आहे, जी सैद्धांतिकदृष्ट्या कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला यशस्वीरित्या प्रत्यारोपित करता येऊ शकते. यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या लाखो रुग्णांसाठी एक मोठी आणि जीवनरक्षक आशा निर्माण झाली आहे.
सध्या रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणारी किडनी मिळणे आवश्यक असते, ज्यामुळे 'ओ' रक्तगटाच्या रुग्णांना सर्वाधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. अमेरिकेमध्ये दररोज सरासरी ११ लोक किडनी न मिळाल्याने मृत्यूमुखी पडतात आणि यातील बहुतांश रुग्ण 'ओ' रक्तगटासाठी प्रतीक्षा करत असतात.
युनिव्हर्सल किडनी तयार करण्याच्या या प्रक्रियेत, शास्त्रज्ञांनी 'ए' (Type A) रक्तगटाची किडनी घेऊन तिचे 'ओ' (Type O) रक्तगटाच्या किडनीमध्ये रूपांतर केले. यासाठी त्यांनी काही विशेष एन्झाईमचा वापर केला. या एन्झाईमचे कार्य शास्त्रज्ञांनी 'मॉलिक्युलर कात्री' प्रमाणे असल्याचे सांगितले आहे.
हे जे एन्झाईम आहेत ते रक्तगटाची ओळख दर्शवणारे साखरेचे रेणू काढून टाकतात. युनिव्हर्सल किडनी तयार झाल्यावर, रक्तगट 'ओ' प्रमाणे ती 'एबीओ अँटिजेन-मुक्त' होते. शास्त्रज्ञांच्या मते, "हे एखाद्या गाडीचा लाल रंग काढून आतला न्यूट्रल प्राइमर उघड करण्यासारखे आहे. एकदा हे झाल्यावर, रोगप्रतिकारशक्तीला तो अवयव परका वाटत नाही."
ब्रे्न-डेड मानवी शरीरात यशस्वी चाचणी:
या 'एन्झाईम-रूपांतरित ओ-किडनी' ची चाचणी एका ब्रे्न-डेड व्यक्तीच्या शरीरात घेण्यात आली. या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या परवानगीने करण्यात आलेल्या चाचणीत, ही किडनी अनेक दिवस कार्यरत राहिली. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाचे (UBC) बायोकेमिस्ट डॉ. स्टीफन विथर्स म्हणाले, "मानवी मॉडेलमध्ये ही प्रक्रिया पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे."
मात्र, तीन दिवसांनंतर किडनीवर पुन्हा 'ए' रक्तगटाचे काही अंश दिसू लागले, ज्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीने प्रतिक्रिया दिली. परंतु ही प्रतिक्रिया सामान्य प्रत्यारोपणात होणाऱ्या प्रतिक्रियेपेक्षा खूपच कमी आणि सौम्य होती.
शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, हे संशोधन मोठे असले तरी, जिवंत व्यक्तींवर चाचण्या सुरू करण्यापूर्वी अजूनही काही आव्हानांवर मात करणे आवश्यक आहे. हे महत्त्वपूर्ण संशोधन 'नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग' या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.