पावसाळ्यात 'या' पदार्थांना बाय म्हणाल तर, आजारांपासून दूर राहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 11:16 IST2019-07-09T11:11:26+5:302019-07-09T11:16:22+5:30
सध्या पावसाळा सुरू असून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणाने कडाक्याची उन्हापासून जरी शांतता दिली असली तरिदेखील आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन आला आहे.

पावसाळ्यात 'या' पदार्थांना बाय म्हणाल तर, आजारांपासून दूर राहाल!
सध्या पावसाळा सुरू असून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणाने कडाक्याची उन्हापासून जरी शांतता दिली असली तरिदेखील आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन आला आहे. डासांची पैदासही पावसाळ्यामध्ये वाढते. त्यामुळे या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खाण्या-पिण्याबाबत सतर्क राहणं आवश्यक असतं. पावसाळा आला म्हणजे, तळलेले गरमा-गरम पदार्थ खाण्याची इच्छा आलीच. पण जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये हेल्दी राहून स्वतःची काळजी घ्यायची असेल तर मात्र या 6 गोष्टी करणं टाळावं लागेल.
पालेभाज्या, कोबी दूर ठेवा
पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किटक आणि डासांच्या प्रजननाचा काळ असतो. हे किडे फळांवर आणि भाज्यांवर खासकरून हिरव्या पालेभाज्यां जसं की, कोबीची भाजी, ब्रोकली, पालक इत्यादींवर आसरा घेतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या भाज्यांचे सेवन करणं टाळा. तसेच या भाज्यांचा आहारात समावेश करत असाल तर व्यवस्थित पाहून, स्वच्छ करून त्यानंतरच करा.
स्ट्रीट फूडपासून दूर राहा
पावसाळ्यामध्ये अनेक बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात. तसेच त्यांची वाढही वेगाने होत असते. अशातच या वातावरणामध्ये स्ट्रीट फूड म्हणजेच, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या स्टॉल्सवरील अन्नपदार्थ खाणं टाळावं. मग ते चाट असो किंवा गोलगप्पे नाहीतर ज्यूस असो. रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे पावसाचं पाणी त्या पदार्थांमध्ये जाण्याची शक्यता असते. तसेच इतर किटकही त्या पदार्थांवर बसू शकतात. परिणामी अनेक हानिकारक बॅक्टेरियांचा या पदार्थांवर समावेश होतो. तसेच ते पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी स्वच्छ असेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला फूड पॉइझनिंग, डायरिया यांसारख्या आजारांचा धोका संभवतो.
तळलेले आणि भाजलेले तेलकट पदार्थ
पावसाळ्यामध्ये शक्य असेल तेवढं तळलेल्या पदार्थांपासून दूर राहणं फार कठिण असतं. पण तुम्ही तळलेल्या पदार्थांपासून जेवढं दूर रहाल तेवढं उत्तम. खरं तर पावसाळ्यातील वातावरणाचा आपल्या शरीराच्या पचनक्रियेवरही परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर खूप तळलेले पदार्थ पचवू शकत नाही. परिणामी पोटाचं आरोग्य बिघडतं.
कापलेली फळं
पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य बॅक्टेरियांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे आधीपासून कापलेल्या फळांचं सेवन अजिबात करू नका. अनेकदा रस्त्यावरून येता-जाता आपण पाहतो की, स्टॉलवर फळं कापून विकण्यासाठी ठेवली जातात. अशा फळांचं सेवन करणं टाळावं. आधीपासूनच कापून ठेवलेल्या फळांमध्ये माश्या, डास यांसारखे किटक बसतात. त्यामुळे अनेक बॅक्टेरिया फळांवर चिकटतात. अशा फळांचं सेवन केल्याने आजारी पडू शकतो.
आंबट पदार्थ
आंबट खाद्यपदार्थ जसं की, चिंच, लोणची किंवा चटणीचे विविध प्रकार यांसारख्या पदार्थांचे सेवन करणं शक्यतो टाळावं. यामुळे शरीरामध्ये वॉटर रिटेंशनची समस्या होऊ शकते आणि पावसाळ्यामध्ये हे पदार्थ खाल्याने तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे या वातावरणामध्ये हेल्दी राहायचं असेल तर आंबट पदार्थांपासून दूर राहणं उत्तम ठरतं.
सी फूड खाणं टाळा
अनेक लोकांना याबाबत माहिती नसते की, मान्सूनचा काळ मासे आणि प्रॉन्सच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या वातारवरणामध्ये मासे, प्रॉन्स यांसारखे पदार्थ अजिबात खाऊ नका. तसेच पावसाळ्यामध्ये हेव्ही नॉनव्हेज पदार्थांपासून दूर राहणंचं उत्तम ठरतं. परंतु जर तुम्हाला नॉन व्हेज खाणं आवडत असेल तर सी फूडपासून दूर राहा आणि चिकन, मटण यांचं सेवन करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआदी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.