कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 08:24 IST2025-09-28T08:23:26+5:302025-09-28T08:24:17+5:30
काम कधीच संपत नाही, पण आपल्या शरीराला मर्यादा आहे. अनेकदा आरोग्य बिघडल्यावरच आपल्याला जाणीव होते की, ‘काही वर्षांचे काम वाचले, पण आयुष्य हातातून निसटले.’ हे टाळण्यासाठी या सोप्या सवयी खूप उपयुक्त ठरतील.

AI Generated Image
कामाचा ताण वाढत असेल, तर आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. काम कधीच संपत नाही, पण आपल्या शरीराला मर्यादा आहे. अनेकदा आरोग्य बिघडल्यावरच आपल्याला जाणीव होते की, ‘काही वर्षांचे काम वाचले, पण आयुष्य हातातून निसटले.’ हे टाळण्यासाठी या सोप्या सवयी खूप उपयुक्त ठरतील.
कामाचे तास ठरवा : रोज उशिरापर्यंत काम करत राहिल्यास, ती सवय होते. म्हणूनच कामाचे तास ठरवून घ्या. काम संपवण्यापूर्वी (साइन आऊट) ५ मिनिटे अलार्म लावून स्वतःला याची आठवण करून द्या. यामुळे शरीर आणि मनाला आराम मिळेल.
छोटे ब्रेक घ्या : आपला मेंदू सतत काम करू शकत नाही. लक्ष विचलित होऊन चुका वाढतात. म्हणून, प्रत्येक तासाला २ मिनिटे उठून उभे राहा, हात-पाय, मान हलवा. यामुळे पुन्हा ताजेतवाने वाटेल. आठवड्यातून किमान एक दिवस स्वतःसाठी ठेवा.
हालचाल करा : एकाच जागी बसून राहणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे पाठदुखी, लठ्ठपणा आणि थकवा जाणवू शकतो. रिकाम्या वेळेत मोबाइलवर वेळ घालवण्याऐवजी ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये ५ मिनिटे चालून या. पौष्टिक अन्न खा.
पुरेशी झोप घ्या : कमी झोपेमुळे चिडचिड, ताण व थकवा वाढतो. झोपण्यापूर्वी अर्धा तास मोबाइलपासून दूर राहा आणि शांत झोप घ्या. डोकेदुखी, चिडचिड ही किरकोळ लक्षणे नाहीत. ती शरीराने दिलेली धोक्याची सूचना आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.
थोडे डिस्कनेक्ट व्हा : सतत मेल, मेसेज आणि कॉलमध्ये व्यग्र राहिल्याने मनाला आराम मिळत नाही. कुटुंबासोबत असताना, जेवण करताना किंवा व्यायाम करताना फोन एरोप्लेन मोडवर ठेवा. यामुळे मनाला शांती मिळेल. झोपण्याआधी वाचन करा.
बाहेर पडा : नैसर्गिक सूर्यप्रकाश शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करतो. सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवल्याने तुमचा मूड सुधारतो आणि झोपेची सायकल नियमित होते. दररोज किमान १० मिनिटे बाहेर सूर्यप्रकाशात फिरण्याची सवय करा.
ताण हाताळा : ताण स्वतःहून कमी होत नाही, तो वाढत जातो. यासाठी दररोज १० मिनिटे स्वतःसाठी ठेवा. या वेळेत दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करा, ध्यान करा किंवा डायरी लिहा. स्वतःचे छंद, आवडी-निवडी जोपासा. यामुळे मन हलके होईल.
‘नाही’ म्हणायला शिका : सगळ्यांना खूश करण्याच्या प्रयत्नात आपली ऊर्जा वाया जाते. जेव्हा कामाचे ओझे खूप वाढेल, तेव्हा स्पष्टपणे सांगा, ‘आत्ता हे काम करणे शक्य होणार नाही.’ यामुळे तुमच्या ‘हो’ला किंमत मिळेल.