मायग्रेन म्हटलं की, डोक्याशी म्हणजेच, मेंदूशी संबंधित आजार असं समजलं जातं. या आजारामध्ये रूग्ण डोकेदुखीने अगदी हैराण होऊन जातात. पण तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, डोक्याव्यतिरिक्त मायग्रेनची समस्या पोटामध्येही होते. खरचं, द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मायग्रेन पोटातही होतो आणि यामध्येही पोटदुखीने व्यक्ती अगदी हैराण होऊ जाते. पोटात होणाऱ्या मायग्रेनला 'अॅब्डॉमिनल मायग्रेन' असं म्हणतात. यामध्ये पोटदुखीव्यतिरिक्त थकवा आणि सतत होणाऱ्या उलट्यां यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, याप्रकारचा मायग्रेन आनुवांशिक कारणांमुळे होतो.
काय आहे अॅब्डॉमिनल मायग्रेन?
अॅब्डॉमिनल मायग्रेन (Abdominal Migraine) हे पोटामध्ये होणाऱ्या मायग्रेनचं वैद्यकिय भाषेतील नाव. हा मायग्रेन मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त होतो. ज्या व्यक्ती आधीपासूनच मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असतील त्यांच्या मुलांमध्येही या आजाराची लक्षणं आढळून येतात. खासकरून, या मायग्रेनची लक्षणं मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये जास्त आढळून येतात. जर मुलं अॅब्डॉमिनल मायग्रेन या आजाराने पीडित असतील तर मोठं झाल्यानंतर त्यांना डोक्याशी संबंधित मायग्रेन होण्याची शक्यता आणखी वाढते.
अॅब्डॉमिनल मायग्रेनची कारणं...
तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, अॅब्डॉमिनल मायग्रेन खरं होतो कशामुळे? खरं तर यामागील योग्य कारणं अद्याप कळू शकलेली नाहीत. परंतु अनेक डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपल्या शरीरामध्ये तयार होणारे दोन कंपाउंड हिस्टामाइन आणि सेरोटोनिन यासारख्या आजाराचं कारण बनतात.
शरीरामधील हे कंपाउंड अधिक चिंता करणं आणि डिप्रेशनचं कारण बनतात. अनेकदा चायनिज फूड्स आणि इंस्टंट नूडल्समध्ये वापरण्यात येणारं मोनोसोडिअम ग्लूटामेट, प्रोसेस्ड मीट आणि चॉकलेट जास्त खाल्याने शरीरात हे कंपाउंड्स तयार होतात. या कारणामुळे अॅब्डॉमिनल मायग्रेनची समस्या होऊ शकते.
अॅब्डॉमिनल मायग्रेनची लक्षणं :
- पोटामध्ये किंवा नाभिजवळ सतत वेदना होणं
- पोट पिवळं दिसू लागणं
- दिवसभर थकवा, सुस्ती जाणवणं
- भूक कमी लागणं किंवा सतत खाण्याची इच्छा होणं
- डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं तयार होणं
अॅब्डॉमिनल मायग्रेनवर उपचार :
कारण समजलं नाही तर अनेकदा ही समस्या गंभीर रूप धारणं करते. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्षं करू नका. लक्षणं वेळीच ओळखून डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. जर या समस्येने गंभीर रूप धारण केलं तर यावर उपचार करणं अगदी कठिण होऊन जातं. अनेकदा याची लक्षणं ओळखल्यानंतर तज्ज्ञ यावर उपचार सामान्य मायग्रेनप्रमाणे करतात. ज्यामुळे अनेकदा रूग्णांना पूर्ण लाभ मिळत नाही. त्यामुळे जेव्हाही या आजाराची लक्षणं मुलांमध्ये दिसून येतील त्यावेळी दुर्लक्षं न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.