दररोज धावतात शंभराहून अधिक गाड्या तरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय गोंदियात का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:05 IST2026-02-27T20:04:39+5:302026-02-27T20:05:30+5:30
Gondia : येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय आणि महाव्यवस्थापक कार्यालय नागपूर येथे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे.

Why is there no Divisional Railway Manager's office in Gondia even though more than a hundred trains run every day?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय आणि महाव्यवस्थापक कार्यालय नागपूर येथे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. पण रेल्वे मंत्रालयाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न कायम आहे. विभागीय रेल्वे कार्यालय गोंदिया येथे सुरु करण्याची नेमकी अडचण काय असा सवाल जिल्हावासीयांकडून केला जात आहे.
रेल्वे मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी जबलपूर-चंद्रपूर आणि गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाला मंजुरी दिली. ही दिलासादायक बाब आहे. गोंदिया हे व्यस्त रेल्वे स्थानक असून दररोज जवळपास १०० एक्सप्रेस, लोकल, डेमू व मालगाड्या येथून धावतात. हे बिलासपूर झोनमधील सर्वाधिक महसूल देणारे स्थानक असून महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर आहे. नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्प, कचारगड, प्रतापगड, मांडोदेवी जवळ असल्याने येथे विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, वैनगंगा एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस सारख्या गाड्या धावतात गोंदिया मध्यवर्ती ठिकाण असल्याने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय सुरू करावे व नागपूरसाठी महाप्रबंधक (झोनल) कार्यालय उभारावे, अशी मागणी माजी जि.प. सभापती अशोक लंजे यांनी अनेकदा रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करुन केली. यामुळे व्यवस्थापन, देखरेख आणि सुविधा वेळेवर मिळतील. शिवाय स्थानिक विकासाला सुध्दा चालना मिळण्यास मदत होईल.
सौंदड येथे थांब्याची मागणी
गोंदिया-बल्लारशा मार्गावरील सौंदड रेल्वे स्थानकावर गाडी क्र. १२८५१-५२ (बिलासपूर-चेन्नई) आणि १२२५१-५२ (वैनगंगा एक्स्प्रेस) यांचा थांबा १५ वर्षे सौंदड येथे होता. पण कोविडनंतर बंद झाला असून अद्याप सुरू नाही. जबलपूर-चंद्रपूर गाडी क्र. २२१७३-७४ चा थांबा सौंदड, अर्जुनी मो., सिंदेवाही येथे द्यावा, अशी मागणी केली आहे. नागपूर डीआरएम यांनी बिलासपूरकडे प्रस्ताव पाठविला आहे.
"गोंदिया येथे रेल्वेचे विभागीय कार्यालय सुरु झाल्यास रेल्वे जाळे अधिक विस्तारण्यास आणि स्थानिक विकासाला चालना देण्यास मदत होईल. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे."
- अशोक लंजे, माजी जि.प. सभापती