दुर्गम,नक्षलग्रस्त भागातील युवकांची रोजगारासाठी भटकंती

By Admin | Updated: November 9, 2014 22:33 IST2014-11-09T22:33:54+5:302014-11-09T22:33:54+5:30

गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या

Wandering for the employment of youth in remote, naxal-affected areas | दुर्गम,नक्षलग्रस्त भागातील युवकांची रोजगारासाठी भटकंती

दुर्गम,नक्षलग्रस्त भागातील युवकांची रोजगारासाठी भटकंती

केशोरी : गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक विकासापासून कोसोदूर जात आहे. औद्योगिक विकास न होण्याला शासनच जवाबदार असलचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या परिसरासाठी घोषित झालेल्या योजना कागदोत्रीच मुरत असल्याची नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. या परिसरात औद्योगिक विकासाची कामे न झाल्यामुळे या भागातील नागरिक औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत आजही आहेत. सुशिक्षीत बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. औद्योगिक विकास होण्याकडे त्यांचे लक्ष केंद्रीत झाले असून बरोजगार युवकांची कामाच्या शोधात मोठ्या शहराकडे भटकंती सुरू आहे.
हे परिसर नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असल्याने या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवावर्ग नक्षलग्रस्त चळवळीकडे वळण्याचे प्रयत्न करू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील लहानमोठे कार्यकर्ते ठेकेदारी क्षेत्रात गुंतलेले आहेत.
मात्र औद्योगिक विकासाकडे कोणाचेही लक्ष नाही. लघू उद्योगांतर्गत खासगी मालकीच्या भात गिरण्या व छोटे-मोठे व्यवसाय आहेत. परंतु त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून मॅनपॉवर कमी करून विद्युत बटन दाबण्याच्या प्रकारामुळे मंजूरसंख्या कमी लागत आहे. या प्रकारामुळ दिवसेंदिवस केशोरी परिसरात रोजगाराची समस्या उग्ररूप धारण करू पाहत आहे.
या भागत मोहफुलांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापासून अनेक प्रकारचे साहित्य तयार होऊ शकतात. त्याचबरोबर बेहळा, हिरडा, आवळा यासारख्या महत्त्वाच्या औषधीयुक्त झाडांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे छोटेमोठे उद्योग निर्मितीला वेळ लागणार नाही. या भागाचा औद्योगिक विकास झाल्यास फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची समस्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही.
या परिसरात इटियाडोह जलाशय आहे. त्या जलाशयाला धरून विद्युत निर्मिती प्लाँट तयार करण्याचा शासनाने नियोजन केला तर या कामावर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळू शकेल. मागील कित्येक दिवसांपासून प्रतागपड हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाले आहे. परंतु अजूनही त्या स्थळाचा विकास झालेला नाही. त्या ठिकाणी मोठ्या उपहारगृहाची तसेच प्रवाशी व पर्यटकांना राहण्याची उत्तम व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. हे स्थळ अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते.
केशोरी परिसर वनसंपत्तीने व्याप्त आहे. शासनाने वनस्पतीपासून तयार होणाऱ्या औषधींचे कारखाने तयार केल्यास अनेकांच्या हातांना कामे मिळतील व केशोरी परिसराचा औद्योगिक विकास होण्यास विलंब लागणार नाही. माणसाला उपयुक्त असणारे घटक या परिसरात विपूल प्रमाणात आहेत. येथील जंगलात मोहफुले, हिरडा, बेहळा, डिंग, लाटव, टेंभरून, आवळा आदी औषधनिर्मितीत उपयोगी ठरणाऱ्या बाबी मिळत मिळतात. त्यामुळे येथे औषध कारखाने उघडण्याची गरज आहे.
या भागात धान व मिरचीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्न घेतले जात नाही. लागूनच इटियाडोह धरण असूनसुध्दा पुरेशा प्रमाणात सिंंचनाची व्यवस्था नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. सिंंचनाची व्यवस्था करून शेतकऱ्यांना दुसरे उत्पन्न घेण्याचे नियोजन कृषी विभागाने करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या भागातील शेतकरी प्रगतीच्या वाटेवर येवू शकणार नाही. तसेच लहान मोठ्या कारखान्यांची निर्मिती झाल्याशिवाय बरोजगारांचा प्रश्न निकाली लागणार नाही. त्यासाठी औद्योगिक विकासाची गरज आहे.

Web Title: Wandering for the employment of youth in remote, naxal-affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.