अवकाळीने पावसाने केली पुन्हा धानपिकांची दाणादाण ! कसानीत होणार वाढ, पंचनाम्यात अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:47 IST2025-10-30T19:44:18+5:302025-10-30T19:47:09+5:30
Gondia : जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली. यात सर्वाधिक १ लाख हेक्टरवर हलक्या धानाचे क्षेत्र आहे. सध्या खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी जवळपास ८५ टक्के झाली आहे.

Unseasonal rains have damaged paddy crops again! There will be an increase in agriculture, but there will be obstacles in Panchnama
गोंदिया : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर बुधवारी (दि.२९) रात्रीपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर गुरुवारी (दि.३०) दुसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे कापणी केलेल्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसाने धानपिकांची दाणादाण केल्याने शेतकऱ्यांवर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याने भिजलेला कडपा बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू असून हे चित्र पाहून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढी विदारक स्थिती आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली. यात सर्वाधिक १ लाख हेक्टरवर हलक्या धानाचे क्षेत्र आहे. सध्या खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी जवळपास ८५ टक्के झाली आहे. तर काही शेतकऱ्यांची मळणी सुरू आहे. जड धान निघण्यास अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशात बुधवार आणि गुरुवारी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने कापणी केेलेल्या आणि शेतातील उभ्या धानपिकाची दाणादाण केली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापणी केलेल्या
धानाच्या कडपा भिजल्या तर बांध्यामध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर धानपिकाचे नुकसान झाले. तर वादळी पावसामुळे शेतातील उभे धान झोपल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. तर अवकाळी पावसाच्या तावडीत धानपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच कुटुंबीयांसह केविलवाणी धडपड सुरू आहे.
भिजलेला कडपा वाचविण्याचे संकट
दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कापणी केलेले धान त्या बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळीच शेतावर धाव घेत पाण्यात बुडालेल्या धानाच्या कडपा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन
बांबूच्या मदतीने त्यावर धानाच्या कडपा टाकून त्या पाऱ्यावर टाकून नुकसान टाळण्याचा शेतकरी प्रयत्न करीत होते. तर कापणी केलेल्या धानाचे भारे भिजल्याने पुंजणे रचण्याची अडचण निर्माण झाली आहे.
धानाला फुटले अंकुर
दोन दिवस कापणी केलेल्या धानाच्या कडपा पाण्याखाली बुडून राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाला अंकुर फुटले आहे. त्यामुळे या धानाची मळणी करुन विक्री करता येणे सुध्दा कठीण झाले असून जनावरे सुध्दा ती खाणार नाहीत अशी स्थिती झाली आहे त्यामुळे केलेला लागवड खर्च भरुन निघणे दूरच असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
मजूर मिळणे कठीण, हार्वेस्टरही शेतात जाईना
अवकाळी पावसामुळे भिजलेल्या धानाच्या कडपा पलटविण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने अख्खे शेतकरी कुटुंबच या कामात व्यस्त असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र आहे. तर अवकाळी पावसाचे संकट कायम असल्याने धानाची लवकर कापणी आणि मळणी करण्यासाठी शेतकरी शेतात हार्वेस्टर नेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, बांध्यांमध्ये पाणी साचून असल्याने हार्वेस्टर फसत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.