पर्यटनस्थळांवरील खर्चाला कात्री
By Admin | Updated: November 6, 2014 22:56 IST2014-11-06T22:56:29+5:302014-11-06T22:56:29+5:30
जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटक आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून केल्या जाणाऱ्या खर्चात गेल्या आर्थिक वर्षात कपात करण्यात आली.

पर्यटनस्थळांवरील खर्चाला कात्री
अनेक कामे अपूर्णच : सोयीसुविधांसाठी पर्यटक आणि भाविक आसुसलेले
गोंदिया : जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटक आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून केल्या जाणाऱ्या खर्चात गेल्या आर्थिक वर्षात कपात करण्यात आली. पर्यटनस्थळांच्या कामांसाठी मंजूर नियतव्ययातून काही रक्कम नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या कामात वळविल्याने पर्यटनासंबंधी काही कामे रद्द करावी लागली. मात्र जी कामे सुरू आहेत त्यातील अनेक कामेही अजून पूर्णत्वास गेलेली नाहीत. त्यामुळे पर्यटकांच्या पदरी निराशा पडत आहे.
सन २०१३-१४ करिता पर्यटनस्थळ विकासासाठी मुलभूत सुविधा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ‘क’ वर्ग पर्यटन स्थळांकरिता एकूण २ कोटी रुपये नियतव्यय मंजूर केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी केवळ १ कोटी ६५ लाख रुपयांचाच निधी उपलब्ध करण्यात आला. त्यामधून जी कामे करण्यात आली त्यापैकी बहुतांश कामे अजून पूर्णत्वास गेलेली नाहीत.
या कामांमध्ये प्रामुख्याने पर्यटनाची माहिती देणारे कॅलेंडर, फोल्डर, पाकेट बुक यासाठी ६ लाख ७० हजार रुपयांची तरतूद केली होती. हे काम उशिरा का होईना, पूर्ण झाले आहे. मात्र प्रत्येकी २ लाख २५ हजार रुपये किमतीचे १० होर्र्डिंग्ज अद्याप तयार झालेले नसून ते काम प्रगतीपथावर असल्याचे नियोजन विभागाच्या अहवालात नमुद आहे. याशिवाय जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे दिवसा व रात्रीही दिसू शकणारे असे १० फलक प्रत्येकी ४६ हजार रुपये किमतीचे अनेक मोक्याच्या ठिकाणी लागणार आहेत. ते कामही प्रगतीपथावर असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत करावयाच्या काही कामांसाठी त्यांना १३ लाख ६३ हजार २५५ रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र ती कामे कुठपर्यंत आली त्याची माहिती नियोजन विभागाकडे उपलब्ध नाही. त्यात एक १७ प्रवासी क्षमता असलेली वातानुकूलित मिनी ट्रॅव्हलर बसची बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी १० लाख ५४ हजार, तसेच त्या वाहनासाठी पडदे, सीट कव्हर, मॅटिन, एलसीडी टीव्ही, डीव्हीडी, व्हिनाईल डेकोरेशन व पार्टीशन आदींसाठी १.५ लाख, वाहनाच्या वार्षिक प्रवासी कराकरिता १ लाख १० हजार रुपये, वाहनाच्या विम्यासाठी ४० हजार रुपये, वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र व परवाना शुल्काकरिता ८०० रुपये असा निधी देण्यात आला. मात्र अजून ते वाहन परिवहन विभागाने उपलब्ध पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले नाही. हे वाहन कधीपर्यंत मिळणार याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाघुळे यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यात काय गौडबंगाल आहे हे समजू शकले नाही.
बोदलकसा मध्यम प्रकल्पाअंतर्गत पर्यटन क्षेत्राकरिता संरक्षण भिंती व बैठक व्यवस्थेचे बांधकाम करण्यासाठी २४ लाख ९८ हजारांचा निधी देण्यात आला आहे. परंतू पाटबंधारे विभागाच्या नियमात धरणाच्या खालील बाजुने कोणतेही काम करता येत नसल्यामुळे हे काम रद्द करण्यात आले आहे.
पांगडी येथील विविध कामांसाठी जवळपास २८ लाखांचा निधी उपवनसंरक्षक गोंदिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यात हर्बल गार्डनसाठी ५० हजार, नक्षत्र वनाकरिता ५० हजार, शिव पंचायत वनाकरिता १५ हजार, नवग्रह वनाकरिता १५ हजार, पंचवटी वनाकरिता १५ हजार, गोंदिया ग्लोरी हट्स करिता ५ लाख, मुलांच्या रस्सी झुल्याकरिता ४ हजार, पहाडी भागात पथमार्गाकरिता २५ हजार, विविध झाडांवर नावपट्टीसह त्याची उपयोगिता दर्शविण्यासाठी २५ हजार, संरक्षण कुटी व शौचालय बांधकामासाठी २ लाख ५० हजार, पाण्याच्या टाकीसह सोलर पंप हाऊसकरिता ३ लाख, लाकडी गजबॉय आणि बांबूच्या बेंचेसकरिता ६० हजार मुलांची घसरपट्टी व विविध खेळणी याकरिता ७५ हजार, रोपवेकरिता ३० हजार तर पांगडी बगिच्याच्या संरक्षक भिंतीकरिता १३ लाख ७९ हजार ८४० रुपये असा एकूण २७ लाख ९३ हजार ८४० रुपयांचा निधी उपवनसंरक्षकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र यापैकी किती कामे पूर्णत्वास गेली याचा अहवाल नियोजन विभागाकडे उपलब्ध नाही.
वरील सर्व निधी मार्च २०१४ पूर्वीच सर्व संबंधित यंत्रणांकडे वर्ग करण्यात आला. तरीही ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. (जिल्हा प्रतिनिधी)