लॉकडाऊनमध्ये एक विवाह असाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:23+5:30
५ मे ला सकाळी ११.०० वाजता पाच पाहुणे घेऊन वर मिथून आपल्या वडील रवींद्र फुंडे यांच्यासोबत मोटारसायकलवर स्वार होऊन वधू मंडपी परसोडी रयत येथे पोहचले. फिजिकल डिस्टन्स व मास्क लावून हा विवाह सोहळा पार पडला. विवाह संपन्न होताच तासभरानंतर मिथूनने लगेच मोटारसायकलवर आपली नववधू रंगीताला घेवून आपल्या राका गावाकडे रवाना झाला.

लॉकडाऊनमध्ये एक विवाह असाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. यामुळे विवाह सोहळे सुध्दा रद्द झाले आहे. तर आता जिल्हा प्रशासनाने वधू वराकडील ३० मंडळीच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्स ठेवून विवाह करण्यास परवानगी दिली आहे. याच नियमाचे पालन करीत आणि मोजक्याच मंडळीच्या उपस्थितीत विवाह करुन वर वधूला घेऊन चक्क मोटारसायलनेच स्वगृही रवाना झाला. असा आगळा वेगळा विवाह सोहळा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी रयत येथे पार पडला.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी रयत येथील तुलाराम भेंडारकर यांची कन्या रंगीता व सडक-अर्जुनी तालुक्यातील राका येथील रवींद्र फुंडे यांचा मुलगा मिथून यांचा विवाहपूर्वीच ठरला होता. ५ मे ला सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांचा शुभमुर्हूत निघाला होता. परंतु कोरोनामुळे राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता विवाह करायचा कसा? असा प्रश्न वर वधू पित्यांना पडला. रवींद्र फुंडे यांच्या मुलाचा परसोडी येथील वधूशी व मुलगी करिष्मा हिचा विवाह भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सोनपुरी येथील जगन कठाणे यांचा मुलगा धनपाल यांच्याशी निश्चित झाला होता. मुलगा व मुलीचे लग्न ५ मे ला सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राका येथे संपन्न होणार होते. मुलाचा व मुलीचा लग्न सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे धामधुमीत करण्याचा रवींद्र फुंडे यांचा विचार होता. परंतु त्यात कोरोनामुळे अडचण निर्माण झाली. त्यांनी प्रशासनाला परवानगी मागीतली असता वराच्या पक्षाकडील पाच व वधूकडील २० वऱ्हाड्याच्या उपस्थित विवाह पार पाडण्याची परवानगी दिली.
५ मे ला सकाळी ११.०० वाजता पाच पाहुणे घेऊन वर मिथून आपल्या वडील रवींद्र फुंडे यांच्यासोबत मोटारसायकलवर स्वार होऊन वधू मंडपी परसोडी रयत येथे पोहचले. फिजिकल डिस्टन्स व मास्क लावून हा विवाह सोहळा पार पडला. विवाह संपन्न होताच तासभरानंतर मिथूनने लगेच मोटारसायकलवर आपली नववधू रंगीताला घेवून आपल्या राका गावाकडे रवाना झाला. तर त्याच दिवशी मिथूनची बहिण करिष्मा हिचा विवाह दुपारी ४ वाजता प्रशासनाने मंजुरी दिलेल्या मोजक्याच पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत पार पडला.
भावाची व्हिडिओ कॉलवरुन उपस्थिती
करिश्माचा भाऊ अजय हा मुंबईला नोकरीवर आहे. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू असल्याने त्याला बहिणीच्या विवाह सोहळ्याला प्रत्यक्षरित्या उपस्थितीत राहता आले नाही. त्यामुळे त्यांने व्हिडिओ कॉलवरुनच लग्न सोहळ्याला उपस्थितीत राहून व अक्षता टाकून बहिणीला आशिर्वाद दिले.दोन्ही लग्न समारंभाला जेवणाची व्यवस्था केलेली नव्हती. सर्व धामधूमीला फाटा देऊन, अगदी साध्या पद्धतीने फिजिकल डिस्टन्स ठेवीत मास्क लावून हा विवाह सोहळा पार पडला.
मुलामुलीचे लग्न आधीच ठरले होते. लग्न समारंभासाठी किराणा, अन्नधान्य सर्व विकत घेतले होते. बॅन्ड, डेकोरेशन, आचारी यांना अॅडव्हान्स देखील देण्यात आले. परंतु कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी व लॉकडाऊनमुळे थाटामाटात लग्न करता आले नाही. त्यामुळे वेळेचे भान ठेवून अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला.
- रविंद्र फुंडे, वराचे वडील, राका सडक अर्जुनी.