पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झोपेतच तिच्या कपाळावर घातली कुऱ्हाड ! १० साक्षीदारांच्या मदतीने झाला १० वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 20:30 IST2025-10-18T20:28:58+5:302025-10-18T20:30:10+5:30
अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, कुऱ्हाडीने केला हल्ला

Suspecting his wife's character, he stabbed her in the forehead while she was asleep! He was sentenced to 10 years in prison with the help of 10 witnesses.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : चारित्र्यावर संशय घेत झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही सुनावणी शुक्रवारी (दि.१७) जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश-१ ए.एस. प्रतिनिधी यांनी केली आहे. पवन सुरज खांडेकर (वय ४२, रा. गोरेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी पवन खांडेकर हा दारूच्या आहारी गेलेला असून, तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिच्यासोबत नेहमी भांडण करीत होता. या सततच्या वादामुळे दोघे पाच ते सहा वर्षापासून वेगवेगळ्या खोलीत राहत होते. मात्र, घटनेच्या काळात आरोपीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने तो पुन्हा पत्नीसोबत राहत होता. १७ मार्च २०२२ रोजी सकाळी १० पासून रात्री ८:३० वाजेपर्यंत पती-पत्नीमध्ये तीव्र वाद झाला.
रात्री जेवणानंतर सर्व झोपल्यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास आरोपीने पत्नी झोपेत असताना तिच्या कपाळावर कुन्हाडीने जोरदार वार केला. या हल्ल्यात सोनाली गंभीर जखमी झाली. तिच्या मुलीने तत्काळ तिला गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर तिला के.टी.एस. रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी असतानाही उपचारादरम्यान सोनाली खांडेकर थोडक्यात बचावली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी १८ मार्च २०२२ रोजी मुलीने गोरेगाव पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी भादंवि कलम ३२६ (गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप गोसावी यांनी काटेकोरपणे करून, आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात पैरवी कर्मचारी सहायक फौजदार शिरसे यांनी सहकार्य केले.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश एस. चंदवानी व सहायक सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी न्यायालयात १० साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि दस्तऐवज सादर केले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य धरत आरोपीचा दोष सिद्ध केला.
असा दिला निकाल
अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी पवन खांडेकर यास भारतीय दंड विधान कलम ३०७ (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत १० वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास २ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.