मुख्याध्यापकाला हटवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचे ठिय्या आंदोलन; पीएमश्री योजनेच्या निधीत घोळ केल्याचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:06 IST2025-12-31T18:55:17+5:302025-12-31T19:06:49+5:30
बैठकीनंतर पदावरून हटविण्याचा निर्णय : पालकांमध्ये रोष व्याप्त

Students and parents stage sit-in protest to remove principal; Allegations of misappropriation of PMShri Yojana funds
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर लोंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी गंभीर आरोप केले. शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेणे, पीएमश्री योजनेच्या निधीत घोळ आदी विविध बाबींवरून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संबंधितांनी तक्रारही दाखल केली. मात्र, तक्रारीनंतरही मुख्याध्यापक लोंढे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मंगळवारी (दि. ३०) सकाळी नऊपासून ठिय्या आंदोलन केले.
विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. मुख्याध्यापक प्रभाकर लोंढे यांची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी रेटून धरली. मुख्याध्यापक लोंढे यांच्या गैर व मनमर्जी कारभाराबद्दल अनेकदा जि.प. पदाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीने लेखी तक्रारी केल्या. शाळेच्या निधीत घोळ केल्याच्या तक्रारी केल्या पण त्याची दखल जि.प. प्रशासनाने घेतली नाही.
त्यामुळेच मंगळवारी सकाळी पालक आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भुमिका घेत आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरगानंथम यांच्यासह शिक्षण समिती सभापती भूपेश नंदेश्वर, जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जि. प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, तहसीलदार प्रज्ञा भोकरे, गटविकास अधिकारी हेमराज गौतम, गटशिक्षणाधिकारी एम. डी. पारधी, जि. प. सभापती डॉ. लक्ष्मण भगत, माजी जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी आंदोलनस्थळी धाव घेत बंदद्वार बैठकीत विद्यार्थ्यांच्या तक्रारी, पालकांचे आरोप यावर चर्चा केली. यानंतर लोंढे यांना मुख्याध्यापक पदावरुन हटविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी झाले अवाक्
ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरगानंथम आंदोलन स्थळी हजर झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडत आम्हाला त्वरित दुसरे मुख्याध्यापक द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. यावेळी विद्यार्थी आणि पालकांची आक्रमक भूमिका पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी अवाक झाले.
पदावरून हटविणार, भ्रष्टाचाराची चौकशी करणार
या बैठकीनंतर मुख्याध्यापक लोंढे यांना मुख्याध्यापकपदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लोंढे हे शिक्षक म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मुख्याध्यापक लोंढे यांच्या कार्यकाळातील सर्व कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दिल्याने उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.