गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:20 IST2025-10-12T10:20:11+5:302025-10-12T10:20:40+5:30
वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
गोंदिया : शहरातील फुलचूर परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे एक पट्टेदार वाघ शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास फिरत असताना य परिसरातील नागरिकांना आढळला. याची माहीती लगेच वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. तब्बल तीन तासांच्या रेस्क्यू आपरेशनंंतर वाघाला जेरबंद करण्यात यश आले. यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला नागरिकांना वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली व भीतीचे वातावरण निर्माण झाले तर वाघ दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरतातच परिसरातील लोकांनी वाघ बघण्यासाठी गर्दी केली होती. यानंतर याची माहिती पोलिस व वन विभागाला मिळतातच घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे याच परिसरात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व अधिकारी व कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. हा परिसर शहराबाहेर नाल्यालगत असून परिसरात झाडेझुडपे आहेत. या बरेचदा वन्यप्राणी आढळतात. मात्र शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक पट्टेदार वाघ आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाघाला रेस्क्यू करण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने वाघाला बेशुद्ध करत रेस्क्यू केले आहे. वाघाला जेरबंद केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेच्या श्वास सोडला. हा वाघ काही दिवसांपूर्वी आमगाव परिसरात दिसला होता हा तोच वाघ असल्याची माहिती आहे.
वन्यप्राण्यांची शहराच्या दिशेने धाव
मागील काही दिवसांपूर्वी शहरात अस्वल आणि हरणांचा शिरकाव झाला होता. त्यानंतर आता जिल्हाधिकारी परिसरात वाघ आढळला. त्यामुळे वन्यप्राणी शहराच्या दिशेने धाव घेत असल्याचे चित्र आहे. मात्र यामुळे शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे.