राज्य महामार्ग देतोय अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:49+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने या राज्यमार्गावर बेशमरची झाडे लावून आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत या रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र यानंतर पुन्हा या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गोंदिया, गोरेगाव, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव यादरम्यान काही ठिकाणी कामे करण्यात आली.

State highways invite accidents | राज्य महामार्ग देतोय अपघाताला आमंत्रण

राज्य महामार्ग देतोय अपघाताला आमंत्रण

ठळक मुद्देवडसा-अर्जुनी मोरगाव-कोहमारा मार्ग : वाहनचालकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
इसापूर : गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा राज्य महामार्ग क्र मांक २७५ आहे. हा राज्य महामार्ग केवळ आता नावापुरताच उरला आहे. महामार्ग पूर्णपणे उखडला असून यावरून वाहन चालविण्यासाठी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने हा राज्य महामार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे.
मागील २-३ वर्षांपासून या महामार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्ता उखडलेला असून गिट्टी बाहेर निघालेली आहे. १८ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने या राज्यमार्गावर बेशमरची झाडे लावून आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत या रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र यानंतर पुन्हा या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गोंदिया, गोरेगाव, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव यादरम्यान काही ठिकाणी कामे करण्यात आली. तर काही ठिकाणी रस्ता बांधकाम होणे बाकी आहे. अनेक दिवसांपासून सीडी वर्कचे काम कासवगतीने सुरू आहे. हे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
तर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या राज्य महामार्गाची दुरूस्ती न झाल्यास वाहनचालकांची प्रचंड अडचण होणार असून अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात अर्जुनी-मोरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता यावर्षी या रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी असून पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्य महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पुन्हा वर्षभर त्रास सहन करावा लागणार आहे.

Web Title: State highways invite accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.