लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आपण साजरा करतो त्या प्रत्येक सणाला त्या-त्या ऋतुमानानुसार काही ना काही महत्त्व आणि शास्त्रीय कारणे व महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. संक्रांत हा केवळ एक सण नसून तो शुभ संकेताचे प्रतीक मानला जातो. हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्यामुळे या थंडीच्या मोसमात शरीराला ऊब व ऊर्जा देण्याचे काम करतात. तीळगुळाचे लाडू सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि फ्लू यासारख्या हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो. त्यामुळे संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ खाल्ले पाहिजेत, असे आहारतज्ज्ञ सीमा मेश्राम यांनी सांगितले.
हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला वातावरणासोबत अनुकूल करण्यासाठी उष्णता निर्माण करण्याची गरज असते. गूळ आणि तीळ या दोन्हींचा प्रभाव खूप गरम असतो. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळगूळ खाल्ला जातो. शरीराला अतिशय आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि लोह हे दोन्ही घटक तीळगुळाच्या मिश्रणातून मिळतात. त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.
आरोग्यास फायदे थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर र गूळ गूळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करीत असतो. तीळ आणि गूळ यांचे सेवन केल्याने आरोग्य आणि सौंदर्य तर सुधारतेच पण शरीरातील चयापचय क्रियाही सुधारते, तसेच सर्दी, खोकला आणि फ्लू यासारख्या हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो.
काय आहे कारण? सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच 'संक्रांत' असे म्हटले जाते. मकरसंक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायणदेखील म्हटले जाते. संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तीळगूळ खाल्ले जातात, तसेच या दिवसा- पासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, अशी आख्यायिका आहे.
"हे दोन्ही पदार्थ ऊष्ण असल्यामुळे शरीराला अतिशय आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि लोह हे दोन्ही घटक तीळगुळाच्या मिश्रणामधून मिळतात. त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते."- सीमा मेश्राम, आहारतज्ज्ञ