गोंदिया जिल्ह्यात रेती माफियांना करणार आता तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:02 PM2020-07-18T13:02:19+5:302020-07-18T13:05:02+5:30

रेती चोरीचे काम करता-करता गब्बर झालेले लोक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरही हल्ला करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेती माफियांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे.

The sand mafia in Gondia district will now be deported | गोंदिया जिल्ह्यात रेती माफियांना करणार आता तडीपार

गोंदिया जिल्ह्यात रेती माफियांना करणार आता तडीपार

googlenewsNext
ठळक मुद्देहल्ला करणाऱ्यांवर लागणार मोक्काअवैध रेती वाहतूक करणे पडेल महागात

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रशासनाने रेती घाटाचे लिलाव केले नाही त्यामुळे गरजूंना चोरीची रेती पुरविली जाते. यात शासनाचा महसूल बुडतो. बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा याचा फटका सहन करावा लागतो. रेती चोरीचे काम करता-करता गब्बर झालेले लोक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरही हल्ला करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेती माफियांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तडीपारच्या कारवाईमुळे रेतीमाफीयांची खैर नाही असे चित्र पुढे येत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव यंदा झाले नाही. परंतु ज्यांना नवीन घरे बांधायची आहेत, ज्यांची घरकुलाची कामे सुरू आहेत अशा लाभार्थ्यांना रेतीची गरज आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत, तर दुसरीकडे रेतीची गरज या दुहेरी समस्येत अडकलेल्या लोकांसाठी जिल्हा प्रशासनाने काही तोडगा काढला नाही. त्यामुळे नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत रेतीमाफीयांनी रेतीची तस्करी करुन त्याची अतिरिक्त दराने विक्री करण्यास सुरूवात केली आहे. एक ब्रास रेतीसाठी कमीत कमी ४ हजार रूपये मोजावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात तर एक ब्रास रेती गोंदियात चक्क १२ हजार रूपयालाही विकली गेली.

जिल्हा प्रशासनाने रेती घाटांचे लिलाव केले नाही.परिणामी त्याचा भूर्दंड नवीन घराचे बांधकाम करणाऱ्यांना बसला. रेती चोरी करणाऱ्या व अधिक पैश्याच्या लोभापायी लोकांची लुबाडणूक करणाऱ्या रेती माफियांवर आता कडक कारवाई करण्यासाठी त्यांना तडीपार करण्याची तयारी जिल्हा पोलिसांनी दाखविली आहे. रेती चोरीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल होणाऱ्या रेती माफीयाला आता तडीपार करण्यात येणार आहे.

रेती घाटांवर फिक्स पाईंट
गोंदिया जिल्ह्यातील रेती माफीयांवर करडी नजर ठेवण्यासाठी महसूल व पोलीस विभागामार्फत स्कॉड तयार करण्यात आला आहे. त्यामार्फत अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून महसूल विभागाच्या मदतीने दंड आकारण्यात येत आहे. रेती माफीयांना पकडण्यासाठी पोलिसांनी काही रेती घाटांवर फिक्स पाईंट तयार केले आहेत.

तडीपारचे तीन प्रस्ताव सादर
गोंदिया जिल्ह्यातील अवैध रेती माफीयांच्या मुसक्या आवळ्यासाठी जुलै महिन्यात डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत दोन व दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत एक असे एकूण ३ रेती माफीयांवर हद्दपार ( तडीपार) करण्याचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.

हल्ला करणाऱ्यांवर मोक्का लावणार
रेती चोरी करणाऱ्या रेतीमाफीयांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचारी, अधिकारी किंवा महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अनेकदा रेतीमाफीयांकडून संघटन करून हल्ला केला जातो. ज्यांची पार्श्वभुमी गुन्हेगारीची असेल आणि त्यांनी हल्ला केला तर त्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

रेती चोरी पकडल्यानंतर दुसऱ्यांदा चोरी करणार नाही असे बॉन्ड लिहूनही त्याचे पालन केले जात नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा रेती चोरी करणाऱ्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवित आहोत.
- मंगेश शिंदे
पोलीस अधीक्षक गोंदिया.

Web Title: The sand mafia in Gondia district will now be deported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू