विना परवाना पाठ्यपुस्तकांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:44 IST2018-06-27T00:43:28+5:302018-06-27T00:44:00+5:30
शहरातील काही नामांकित शाळांकडून शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात आहे. सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांवर बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची लूट सुरू आहे.

विना परवाना पाठ्यपुस्तकांची विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील काही नामांकित शाळांकडून शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात आहे. सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांवर बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची लूट सुरू आहे. मात्र नियमानुसार शाळांना पाठपुस्तकांची शाळेतूनच खरेदी करण्याची सक्तीच करता येत नाही. तसेच या शाळांकडे पाठ्यपुस्तके विक्री करण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
मागील आठवडाभरापासून विविध शाळांच्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी सध्या लगबग सुरू आहे. बाजारपेठेत सर्वच अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध आहे. मात्र शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. तर सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांच्या मुळ किंमतीपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची अक्षरक्ष: लूट केली जात आहे. पाठपुस्तकांवर वाढीव किंमतीचे स्टॉम्प मारले जात आहे. काही पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा विरोध केला. याची तक्रार सुध्दा शाळा व्यवस्थापनाकडे केली मात्र त्यांनी शाळेतूनच पाठपुस्तके घ्यावी लागतील. ती घ्यायची नसतील तर आपल्या पाल्याचा आमच्या शाळेत प्रवेश घेवू नका असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे पालक सुध्दा हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शाळेला शिक्षणाचा अधिकार कायदातंर्गत शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती करता येत नाही. पाठ्यपुस्तकांची विक्री करण्यासाठी नगर परिषद परवाना विभाग व संबंधित विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे. ज्या शाळांकडे परवाना नसेल त्यांना याची विक्री करता येत नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नगर परिषद परवाना विभागाकडे जावून याची माहिती घेतली असता शहरातील एकाही खासगी शाळेकडे पाठ्यपुस्तकांची विक्री करण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत शहरातील एकाही खासगी शाळेने पाठ्यपुस्तकांची विक्री करण्यासाठी परवाना घेण्यासाठी साधा अर्ज देखील केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे विना परवानाच हा सर्व प्रकार सुरू आहे. तर शिक्षण विभाग तक्रार नसल्याचे सागंत कारवाई टाळत आहे.
कारवाई टाळण्यासाठी सोसायट्यांचा आधार
काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पाठ्यपुस्तकांची विक्री करण्यासाठी शाळेतच खरेदी विक्री सोसायटीची स्थापना केली आहे. त्यामुळे जेव्हा या शाळांवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी जातात तेव्हा शाळा व्यवस्थापन त्यांना आमच्या शाळेत सोसायटी असून त्यातंर्गत पाठ्यपुस्तके विक्री करता येत असल्याचे सांगतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाठ्यपुस्तकांसह वह्याबुक घेण्याची सक्ती
शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पाठपुस्तकांची शाळेतून खरेदी करण्याची सक्ती करताना यासोबत वह्याबुके देखील शाळेतून घेणे बंधनकारक केले आहे. यासाठी त्यांनी काही छापनेखाने मालकांशी करार केला असून त्यांच्याकडून वह्या बुकांची छपाई करुन त्यांच्या मनमर्जीच्या दरानुसार त्याची विद्यार्थ्यांना विक्री केली जात आहे.
नगर परिषद करणार कारवाई
नगर परिषद अधिनियमानुसार नगर परिषद क्षेत्रात कुठलाही व्यवसाय सुरू करताना नगर परिषदेच्या परवाना विभागाकडून त्याचा रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. विना परवाना व्यवसायक करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे नगर परिषद पाठ्यपुस्तकांची विक्री करणाºया खासगी शाळांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करेल असे परवाना विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.