पॉझिटिव्ह प्रयत्नांनी जिल्हा होतोय कोरोना निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:01:05+5:30
पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. यासर्व प्रयत्नांमुळेच मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. या सर्वांचे श्रेय निश्चितच या तिन्ही यंत्रणांना जाते.

पॉझिटिव्ह प्रयत्नांनी जिल्हा होतोय कोरोना निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात २६ मार्च रोजी कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. यानंतर जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यात युध्द पातळीवर उपाय योजना राबविल्या. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बारीक नजर ठेवली. नाकाबंदी करुन जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांवर नजर ठेवली.संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षण दिसतात त्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करुन व त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवून उपचाराला सुरूवात केली. संपूर्ण जिल्ह्यात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. एकंदरीत कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पॉझिटिव्ह प्रयत्न केल्याने गोंदिया जिल्हा कोरोना निगेटिव्ह होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.
जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधीत रुग्णांवर १७ दिवस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात आले. सदर रुग्णाने सुध्दा उपचाराला उत्तम प्रतिसाद दिल्याने त्याच्या तिनदा पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.
त्यामुळे तो पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने त्याला तीन दिवसांपूर्वीच रुग्णालयात सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. मात्र यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग व पोलीस विभागाने जिल्ह्यात कुठेच शिथिलता येऊ दिली नाही.
जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त राहावा यासाठी अजुन काय आवश्यक उपाययोजना करता येईल यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे दिवसभरात तीन चारेवेळा अधिकाऱ्यांकडून आढावा घेत असतात. त्यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा सुध्दा सकाळपासूनच कामाला लागते. यात त्यांना आरोग्य व पोलीस विभागाचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे.
पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.
यासर्व प्रयत्नांमुळेच मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. या सर्वांचे श्रेय निश्चितच या तिन्ही यंत्रणांना जाते.
प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील एकूण १३३ नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी १२३ नमुन्यांचा चाचणी अहवाल आज १४ एप्रिलला प्राप्त झाला. त्यामध्ये १२३ नमुने निगेटिव्ह आलेले आहे. तर ९ नमुन्यांचा चाचणी अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
६१ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात
जिल्ह्यात विदेशातून आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर आहे. जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या काही जणांना होम क्वारंटाईन केले जात आहे. तर ६१ जणांना शासकीय कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे.यात गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ५१ आणि लहीटोला १० अशा एकूण ६१ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.