रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:09+5:30

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने या रेल्वे स्थानकावर बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या सुध्दा अधिक आहे. कोरोना व्हायरसचा सवार्धिक प्रादुर्भाव हा बाहेर देशातून येणाऱ्या नागरिकांपासून होत आहे.

Platform ticket at the train station 50 rupees | रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी उपाय योजना : कोरोना इफेक्ट, रेल्वे प्रशासनाची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे या आजाराचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ शकतो.त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व रेल्वे स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकीटाच्या दरात गुरूवारपासून वाढ केली असून आता प्लाटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये करण्यात आले आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने या रेल्वे स्थानकावर बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या सुध्दा अधिक आहे. कोरोना व्हायरसचा सवार्धिक प्रादुर्भाव हा बाहेर देशातून येणाऱ्या नागरिकांपासून होत आहे. तसेच कोरोनामुळे विदेशात असलेले भारतीय नागरिक स्वगृही परतत आहे. त्यामुळे यापैकी काहीजण रेल्वेने प्रवास करीत असल्याने कोरोनाचा संसर्ग इतर प्रवाशांना सुध्दा होऊ शकतो.त्यामुळे रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही उपाय योजना सुरू केल्या आहे. अनेकजण आपल्या सहकारी किंवा नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येतात. यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी होते. तर काहीजण १० रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट काढून रेल्वे स्थानकावरील वायफायचा उपयोग करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने गर्दी टाळण्याचे निर्देश दिले आहे. याच पार्श्वभुमीवर रेल्वे विभागाने गुरूवारी (दि.१९) गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म तिकीटाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे गुरूवारपासून गोंदिया रेल्वे स्थानकावर प्लाटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता अधिकचा भूर्दंड सोसावा लागणार आहे. मात्र हा निर्णय केवळ काही दिवसांसाठीच असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा प्लॅटफार्म तिकीटाचे दर जैसे थे होणार असल्याचे रेल्वे वाणिज्य विभागाचे मुकेश कुमार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
प्लॅटफार्म तिकीटाला जवळच्या प्रवासाचे तिकीट
रेल्वे विभागाने गुरूवारपासून प्लॅटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये केले आहे. मात्र यावर काहींनी शक्कल शोधून काढली आहे. गोंदिया ते गंगाझरी, नागरा, कटंगी, हिरडामाली, गोरेगाव या प्रवासाचे दर केवळ १० रुपये आहे. त्यामुळे पन्नास रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट काढण्याऐवजी १० रुपयाचे जवळच्या प्रवासाचे तिकीट काढून प्लाटफार्मवर प्रवेश करता येतो.त्यामुळे काहींनी याचा अवलंब करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.
दररोज ४०० प्लॅटफार्म तिकिटांची विक्री
गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर नातेवाईक किंवा मित्रांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणारे प्लॅटफार्म तिकीट काढतात. त्यामुळेच गोंदिया रेल्वे स्थानकावर दररोज ४०० प्लॅटफार्म तिकिटांची विक्री होत होती. मात्र आता गुरूवारपासून दर वाढविल्याने यात कितपत घट होते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मोफत वायफायचा वापर करणाऱ्यांचा हिरमोड
रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अनेक जण दहा रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट काढून वायफायचा वापर करीत होते. मात्र आता प्लॅटफार्म तिकिटाच्या दरात वाढ झाल्याने त्यांचा सुध्दा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे.

Web Title: Platform ticket at the train station 50 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.