अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 'एकला चलो'चा नारा! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार
By अंकुश गुंडावार | Updated: September 29, 2025 16:31 IST2025-09-29T16:12:29+5:302025-09-29T16:31:30+5:30
प्रफुल्ल पटेल : शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्नरत

Pawar's NCP's slogan 'Ekla Chalo'! Will contest local body elections on its own
गोंदिया : लोकसभा व विधानसभा निवडणुका या महायुती म्हणून लढण्यात आल्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये थोडे वेगळी स्थिती असते. पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये याबाबत एक वेगळा उत्साह असतो.या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या स्वबळावर लढाव्यात असा सूर होता. त्याचीच दखल घेत पक्षाने घेत स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीला लागण्याचा सूचना केल्या असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी (दि.२९) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
साेमवारी ते जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आले असता त्यांच्या रामनगर येथील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांसह संवाद साधला. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन उपस्थित होते. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या चितंन शिबिर पार पडले. यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या स्वबळावर लढावाव्यात असा सूर आळवला. त्यांच्या भावना लक्षात घेत त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहे. ज्या ठिकाणी महायुती करुन निवडणुका लढण्याची तयारी असेल तिथे महायुती म्हणून सुध्दा निवडणुका लढविल्या जातील. निवडणुकीनंतर सत्ता स्थापना करताना तडजोड करण्याची वेळ आल्यास महायुती करुनच सत्ता स्थापन करण्याला प्राधान्य असेल असेही त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीने राज्यात चिंताजनक स्थिती
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चिंताजनक स्थिती आहे. या संकटग्रस्त परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सुध्दा शेतकऱ्यांना भरीव मदत कशी करता येईल याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
मेळावे उत्सवाऐवजी शेतकऱ्यांना मदत करा
अतिवृष्टीमुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती आहे. बळीराजा संकटात आहे असून अनेक कुटुंब उघड्यावर आली आहे. अशा स्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. मेळावे, उत्सवावर खर्च न करता संकटातील शेतकऱ्यांना मदत करावी असे खा. पटेल यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाला धक्का नाही
मराठा समाजाला आरक्षण लागू करताना ओबीसी समाजाववर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. त्यामुळे यावरुन कुणीही ओबीसींची दिशाभूल करु नये. तर काहीजण यावरुन आपली पोळी भाजून घेत असून अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिला.