Patient inconvenience will not be tolerated | रुग्णांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही
रुग्णांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही

ठळक मुद्देअनिल देशमुख : मेडिकलमधील अनियमितता दूर करण्याचे निर्देश, जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न दोन्ही रुग्णालयांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची रिक्त पदे आणि सोयी सुविधांचा अभाव व वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाचा मुद्दा देखील रखडला आहे. जिल्ह्यातील रूग्णांना दर्जेदार आरोग्याच्या सोयी मिळाव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. मात्र समन्वयाअभावी रुग्णांची गैरसोय होत असून ती खपवून घेतली जाणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील अनियमितता दूर करण्यासाठी आरोग्यमंत्र्यासह बैठक घेणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी (दि.२४) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते. पालकमंत्री अनिल देशमुख म्हणाले गोंदिया शासकीय रुग्णालयांसदर्भात अनेक तक्रारी आहेत. या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये सुध्दा समन्यवयाचा अभाव आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबई येथे आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थित बैठक घेऊन या सर्व समस्या मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारीत आहे. त्यामुळे कृषी विषयक योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. सन २०१९-२० या वर्षात शेतकरी बचत गटांकरिता कृषी अवजारे बँक उघडण्यासाठी २ कोटी ४६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांमध्ये अध्ययनस्तर निश्चिती व गुणवत्ता विकास करण्यासाठी ७६ कोटी रुपयांच्या निधी तरतूद केली आहे. तर महसूल विभागाचा रेकार्ड आॅनलाईन व अद्यावत करण्यासाठी २ कोटी रुपये आणि प्राथमिक शाळांमध्ये जलशुध्दीकरण यंत्रासाठी ७७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियोजन भवन आहे. त्याच धर्तीवर गोंदिया येथे नियोजन भवन उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचा थकीत असलेला मग्रारोहयोच्या कुशल कामांचा १८ कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येईल. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात पादंण रस्ते तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे रोजगार उपलब्ध होण्यास देखील मदत होईल असे सांगितले.

कृषी पंपाचा बॅकलॉग पूर्णपणे दूर करणार
गोंदिया जिल्ह्यात कृषी पंपाच्या जोडणीचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. जिल्ह्यातील आमदार आणि लोकप्रतिनिधीनी सुध्दा ही समस्या आपल्यासमोर मांडली. शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या जोडण्या त्वरीत देण्यात यावे.तसेच अर्ज केलेला एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाºयांना दिले आहे. पुढील आठवड्यात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह नागपूर येथे बैठक घेऊन हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावण्यात येईल.
तांदूळ घोटाळ्याची चौकशी करणार
शासनाकडून भरडाईसाठी तांदळाची उचल राईस मिलर्सनी केली. मात्र काही राईस मिलर्सनी अद्यापही जवळपास ५०० कोटी रुपयांचा तांदूळ शासनाकडे जमा केला नाही. हा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलबिंत आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
पुढील वर्षी दीडशे युवकांना मुंबईला पाठविणार
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या मॅराथॉनमध्ये गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आठ युवकांनी सहभागी घेऊन यश प्राप्त केले. या सर्व युवा खेळाडूंचा २६ जानेवारीला मुख्य शासकीय कार्यक्रमात सत्कार करण्यात येईल. तसेच पुढील वर्षी जिल्ह्यातून दीडशे युवकांना मॅराथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविण्यात येईल. तसेच त्यांचा सर्व खर्च शासन करेल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

कलेक्टर आणि एसपी देणार धान खरेदी केंद्राना भेट
जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर बराच सावळागोंधळ सुरू आहे. तर राईस मिलर्सकडून भरडाई केलेला तांदूळ स्विकारतांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ घेतल्या जात असल्याच्या तक्रारी आहे. तर बाहेरुन आलेले गुणवत्ता नियंणत्रक याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ही सर्व अनियमितता दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे काही केंद्राना भेटी देऊन याची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Patient inconvenience will not be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.