अर्जुनी मोरगाव : नुकत्याच सरपंचपदाच्या झालेल्या आरक्षण सोडतीत बोरटोला ग्रामपंचायतमध्ये तिसऱ्यांदा महिला सरपंच आरक्षण आल्याने इंजोरी येथील दीपंकर उके यांनी आरक्षणावर हरकत घेतली आहे. प्रशासनाने दखल घेऊन आरक्षण बदलाची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
सरपंचपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी (२८) काढण्यात आली. यात २००५ पासून प्रत्येक ग्रामपंचायतींचा सरपंचपदाचा आरक्षण गोषवारा तयार करण्यात आला. त्यानुसार, २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचाचे आरक्षण ठरविण्यात आले. बोरटोला ग्रामपंचायतमध्ये २००५ ते २०१० याकरिता सर्वसाधारण, २०१० ते २०१५ करिता सर्वसाधारण, २०१५ ते २०२० करिता अनुसूचित जमाती स्त्री व २०२० ते २०२५ करिता अनुसूचित जमाती स्त्री (ईश्वर चिठ्ठीद्वारे) असा गोषवारा प्रशासनाकडून तयार करण्यात आला. मात्र, हा गोषवारा चुकीचा आहे. २०१० ते २०१५ या कालावधीसाठी सर्वसाधारण स्त्री सरपंचासाठी ही जागा आरक्षित होती. २०१० पासून सतत तिसऱ्यांदा महिला सरपंचाचे आरक्षण आले. हा घोळ गोषवारातील चुकीमुळे झाला. यावर दीपंकर उके यांनी आक्षेप घेतला असून, तातडीने यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.