चार विधानसभेतील १६ उमेदवारांंना नोटीस
By Admin | Updated: October 11, 2014 01:46 IST2014-10-11T01:46:41+5:302014-10-11T01:46:41+5:30
अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणूक अधिकारी (खर्च व सनियंत्रण) यांना खर्चाची ...

चार विधानसभेतील १६ उमेदवारांंना नोटीस
गोंदिया : अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणूक अधिकारी (खर्च व सनियंत्रण) यांना खर्चाची योग्य माहिती न दिल्यामुळे निवडणूक आयोगाने १६ उमेदवारांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे त्यात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील चार उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली. त्यात शिवसेनेचे राजकुमार कुथे, काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, राष्ट्रवादीचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता, भाजपचे विनोद अग्रवाल यांनी खर्च कमी दाखविल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रातील केशव भोयर या अपक्ष उमेदवाराने आपल्या खर्चाचा हिशेबच सादर न केल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सहा उमेदवारांना नोटीस मिळाली. त्यात अपक्ष महेश शेंडे व दिलीप वालदे या उमेदवारांनी खर्च सादरच केला नाही, तर अजय लांजेवार, काँग्रेसचे राजेश नंदागवळी, दिलवर्त रामटेके, राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्या खर्चात तफावत असल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर, शिवसेनेचे पंचम बिसेन, भाजपचे विजय रहांगडाले, बसपाचे दीपक हिरापुरे व अपक्ष दिलीप बंसोड यांनी खर्च कमी दाखविल्यामुळे निवडणूक विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे.
जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करण्यासाठी सुरत येथून खर्च निरीक्षक ललित बिष्नोई आले आहेत. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी तीन वेळा केली जाते. उमेदवारांच्या खर्चाचे वेळापत्रक निवडणूक विभागाने ठरवून दिले आहे. उमेदवारांसाठी अॅनेक्झर १४ भरून द्यायचा असतो. यात दररोज काय खर्च केला याचा लेखाजोखा उमेदवाराला निवडणूक विभागाला सादर करायचा असतो. अॅनेक्झर १४ अ मध्ये दैनंदिन खर्च उमेदवारांना देणे बंधनकारक असतो. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम ७७ नुसार खर्च निरीक्षक जेव्हा मागेल तेव्हा उमेदवाराला तो हिशेब देणे बंधनकारक आहे. त्यात उमेदवारांची रोख नोंदवही असते. त्यात आवक-जावक व कॅश रजिस्टर नोंदणी केल्या जाते. तसेच उमेदवारांच्या बँकेच्या पासबुकच्या नोंदी देणे आवश्यक असते.
उमेदवारांनी केलेला खर्च निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या आतच होणे गरजेचे असते. पण नोटीस बजावण्यात आलेल्या उमेदवारांनी या नोंदी व्यवस्थित घेतलेल्या नाहीत. (तालुका प्रतिनिधी)