शेतीतून मिळवितात १० लाखांचा निव्वळ नफा

By Admin | Updated: November 30, 2015 01:50 IST2015-11-30T01:50:37+5:302015-11-30T01:50:37+5:30

पारंपरिक शेतीला त्यागून आधुनिक पद्धतीने शेती करण्याची मनोमन इच्छा बाळगणाऱ्या शासकीय नोकराने बागायती शेतीकडे लक्ष दिले.

Net profit of 10 lakhs earned through agriculture | शेतीतून मिळवितात १० लाखांचा निव्वळ नफा

शेतीतून मिळवितात १० लाखांचा निव्वळ नफा

उच्चशिक्षित तरुणांचा शेतीकडे कल : शेतीवर वॉच ठेवण्यासाठी बसविले सीसीटीव्ही कॅमेरे
नरेश रहिले गोंदिया
पारंपरिक शेतीला त्यागून आधुनिक पद्धतीने शेती करण्याची मनोमन इच्छा बाळगणाऱ्या शासकीय नोकराने बागायती शेतीकडे लक्ष दिले. सोबतीला पत्नी व मुलगा असल्यामुळे त्याने शेतीला व्यवसायाचे रुप देऊन आधुनिक शेती करुन वर्षाकाठी १० लाखांचा निव्वळ नफा कमविण्याचा पायंडा त्यांनी रचला.
गोरेगाव तालुक्याच्या कटंगी येथील शेतकरी फनेंद्र नत्थूजी हरिणखेडे (५३) हे गोंदियाच्या जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. नोकरीवरुन घरी परतल्यानंतर पूर्णवेळ शेतीकडे देऊन शेतीला उत्पनाच्या मुख्य स्त्रोताच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा त्यांचा मानस कृतीत बदलला. त्यांच्याकडे १४ एकर असलेल्या शेतीपैकी ७ एकरात बागायती, २ एकरात वनशेती, १ एकरात शेततळी तर उर्वरित ४ एकरात ते धानाची शेती करतात. २०११ पासून त्यांनी बागायती शेतीला सुरुवात केली. पत्नी नवसनबाई हरिणखेडे व मुलगा रोहित हरिणखेडे यांना मार्गदर्शन करुन शेतीतून उत्तम पीक घेऊन त्यापासून चांगली मिळकत कशी घेता येईल याच्या विवंचनेत असताना त्यांनी सन २०११ मध्ये ५ एकरात उसाचे उत्पादन घेतले. त्या उत्पादनात एकरी ६५ ते ७० टन उसाचे उत्पादन त्यांनी घेतले. धानाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक मिळकत मिळाल्यामुळे त्यांनी बागायती शेती करण्याची संकल्पना पुढे आणली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी काकडी, कारले, चवळीच्या शेंगा, भेंडी, गवार, वांगी, तूर, भाजीपाला, कोथिंबीर असे उत्पादन घेतले जातात. एकरी एका लाखाचे उत्पादन ते घेत आहेत. वर्षाकाठी १४ लाखाचे उत्पन्न १४ एकरातून काढले जाते. ४ लाख रुपये खर्च होत असून १० लाख रुपये शुद्ध नफा होत असल्याची माहिती हरिणखेडे यांनी दिली.
आधुनिक शेती करताना ट्रॅक्टर, पावर ट्रेलर, बैलजोडीचा वापर ते करतात.
७० टक्के सेंद्रीय शेती तर ३० टक्के रासायनिक शेती करुन आर्थिक प्रगती साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेण खत, गौमूत्र यांच्या मिश्रणात कडूनिंब, करंजीचा पाला टाकून त्याद्वारे द्रावण तयार करुन ते द्रावण फळ भाज्यांवर मारल्याने रोग दूर होतो असे त्यांनी सांगितले.
या बागायती शेतीसाठी त्यांनी ५ एकरात ठिंबक सिंचन लावले आहे. याशिवाय त्यांनी चंदनाची, अंजीरची झाडे, हापूस आंबा लावला आहे. बागायती शेतीतून आर्थिक उन्नती साधण्याच्या फनेंद्र हरिणखेडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

डॉक्टर होणारा रोहितही करतो शेती
गोंदियात बीएएमएसचे शिक्षण घेणारा रोहित फनेंद्र हरिणखेडे (२४) याने संपूर्ण शेतीकडे लक्ष घातले आहे. डॉक्टर म्हणून काम करताना गावाची सेवा करेल तर उत्पन्नाचे स्त्रोत व गावातीलच मजुरांना रोजगार देण्याची संकल्पना रोहितच्या मनात असल्याने त्याने वडीलांच्या या कार्याला सतत पुढे नेण्यासाठी शेतीकडे लक्ष दिले आहे.

पाच सीसीटीव्ही कॅमेरे ठेवतात नजर
गोंदिया जिल्ह्यातील एकमेव फनेंद्र हरिणखेडे यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आपल्या शेतातील माल चोरीला जाऊ नये यासाठी शेतातील मुख्य ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे चोरीवर आळा बसलाच.परंतु शेतात येणारे-जाणारे कोन याचीही माहिती या कॅमेऱ्यातून मिळते. वर्षभरापुर्वी ३० हजार रुपये खर्च करून येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
हरिणखेडे यांनी शेतीला फुलवून गावातील १५ ते २० लोकांना कायम स्वरुपी रोजगार दिला. शेतीतून आर्थिक उन्नती साधून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी त्यांनी शेती फुलविली. परंतु कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीकडे एकदाही भेट दिली नाही. त्यांच्या शेताला भेट देणाऱ्यांसाठी त्यांनी व्हिजीट बुक ठेवली. परंतु या व्हिजीट बुकमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या भेटीच नाहीत.
नऊ लाखांचे लाख उत्पादन घेणार
एका एकरात लाख उत्पादन करणारी एक हजार रोपटी त्यांनी लावली आहेत. दुसऱ्या वर्षापासून सलग ४ ते ५ वर्ष हे लाखाचे उत्पादन घेतले जाणार आहे. ‘सेमीयालता’ या झाडांची रोपटे एका एकरात लाऊन ते त्याच्यावर लाख उत्पादन घेणार आहेत. तेढा, निंबा येथील चांदलमेटाच्या बचत गटाने केलेल्या उपक्रमामुळे त्यांना दिशा मिळाली. त्यांनी १ हजार रोपटे लाऊन दुसऱ्या वर्षापासून एका झाडापासून तीन किलो लाख निघणार असल्याचे सांगितले. एका वर्षात एका एकरातून ३० क्विंटल लाखाचे उत्पादन घेतल्यास त्याची किंमत आजच्या स्थितीत ९ लाख आहे.
शेततळीमुळे पाण्याची पातळी वाढली
शेतात पाण्याशिवाय उत्पादन घेता येत नाही. ४ ठिकाणी बोअर केले. तरीपण मुबलक प्रमाणात पाणी लागत नसल्यामुळे हरिणखेडे यांनी आपल्या शेतात ७ ठिकाणी बोअर केले आहेत. यातील ३ बोअरला मुबलक पाणी असून ते सिंचनासाठी वापरले जाते. या विंधन विहिरींना पाण्याची पातळी वर राहावी यासाठी पावसाळ्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी एक एकरात शेततळी तयार केली आहे. ती शेततळी पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मोलाची मदत करीत असून या ठिकाणी मत्स्यपालन ही केले जाते. दरवर्षी १ लाखाच्या घरात मासोळ्यांची विक्री करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Net profit of 10 lakhs earned through agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.