अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीवर महिलाराज; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजुषा बारसागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 16:04 IST2022-02-16T15:55:50+5:302022-02-16T16:04:47+5:30
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजुषा बारसागडे यांची बिनविरोध निवड झाली तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या ललिता टेंभरे निवडून आल्या.

अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीवर महिलाराज; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजुषा बारसागडे
गोंदिया : अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीवर महिलाराज आले आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजुषा बारसागडे यांची बिनविरोध निवड झाली तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या ललिता टेंभरे निवडून आल्या. विशेष म्हणजे येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची युती झाली आहे.
स्थानिक नगरपंचायतीवर कुणाची सत्ता स्थापन होणार हा संभ्रम होता. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न झाले. परंतु वाटाघाटी होऊ शकल्या नाहीत. अखेर राष्ट्रवादी काँग्रेससोबत इतर पक्षांनी जुळवून घेतले. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. नगराध्यक्षपदासाठी चार महिला नगरसेविकांनी नामांकन दाखल केले. मंगळवारी भाजपच्या दोन व काँग्रेसच्या एका महिला नगरसेवकांनी नामांकन परत घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंजुषा बारसागडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक होता. त्यांची बुधवारी नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली.
उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या ललिता टेंभरे व काँग्रेसचे सर्वेश भुतडा यांनी नामांकन दाखल केले. यात टेंभरे यांना १२ व भुतडा यांना ५ मते मिळाली. उपाध्यक्षपदी टेंभरे यांची निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांनी कामकाज सांभाळले. मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे स्वागत केले.