लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सहावा व्याघ्र प्रकल्प असून, त्याची स्थापना सन २०१३ मध्ये करण्यात आली. या व्याघ्र प्रकल्पांतर्गत बरेच पर्यटन गेट सुरू आहेत. मात्र, या प्रकल्पाअंतर्गत येणारे मुरदोली गेट काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते. ते अद्यापही सुरू करण्यात आले नाही. परिणामी याचा या परिसरातील रोजगारनिर्मितीवरसुद्धा परिणाम होत आहे. त्यामुळे हे गेट सुरू करण्यास नेमकी अडचण काय, असा सवाल पर्यटक आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मुरदोली गेट सन १९९६-१९९७ पासून काही कारणामुळे बंद करण्यात आले. मुरदोली हे गेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर असून, पर्यटनाला चालना देणारे आहे. प्रशासन स्तरावर काही वर्षांपासून हे गेट उघडण्याबाबत प्रयत्न करण्यात आले; पण त्याला यश आले नाही. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची स्थापना सन २०१३ मध्ये झालेली आहे. त्याचा गाभा क्षेत्र ६५६३६.४८ हेक्टर, तर बफर क्षेत्र १२४१२७.३७३ हेक्टर आहे. महाराष्ट्रातील उर्वरित सर्व व्याघ्र प्रकल्पाचे कोर व बफर क्षेत्र एकसंघ नियंत्रणाअंतर्गत क्षेत्र संचालक यांच्यामार्फत नियंत्रित केले जाते. बफर क्षेत्र एकसंघ नियंत्रणाखाली आल्यास व्यवस्थापकीय सुधारणा होऊन त्याअंतर्गत १८० गावांत मानव वन्यजीव संघर्ष हाताळणे, स्थानिकांना रोजगारविषयक संधी वाढविणे, पर्यटनविषयक विविध उपक्रम राबविणे शक्य होणार आहे. क्षेत्रात ६ पर्यटन गेट असून, वर्षभरात जिप्सी चालक व पर्यटक मार्गदर्शक यांना जवळपास ५० जणांना त्यातून रोजगार मिळतो. बफर क्षेत्रात पर्यटन सुरू करण्याबाबतची मागणी आहे. मात्र, एकसंघ नियंत्रण झाल्यानंतर सध्याचे पर्यटन मार्ग व उपलब्ध होऊ शकणारे नवीन क्षेत्र व मार्ग यांचा सकारात्मक विचार करून नवीन पर्यटन गेटचा विचार केला जाऊ शकतो. त्यातून रोजगारनिर्मितीस चालना देण्यास मदत होऊ शकते.
तीन ग्रामपंचायतीने दिले क्षेत्र संचालकांना पत्रगोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर मुरदोली गेट सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार, ग्रामपंचायत कार्यालय पाटेकुर्रा व ग्रामपंचायत कार्यालय मुरदोली यांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियाचे क्षेत्र संचालक यांना पत्र दिले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मुरदोली पर्यटन गेटला सुरू करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी या ग्रामपंचायतीने केली आहे.
दोन जिल्ह्यांत अडकला आहे प्रकल्पगोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा विभागला गेला आहे. यातच गोंदिया जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा ७० टक्के भाग येतो. भंडारा जिल्ह्यात या प्रकल्पाचा फक्त ३० टक्के भाग जातो. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा या प्रकल्पात मोडत असल्याने कुठे तरी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या सोयीसुविधांपासून वंचित आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीनतानवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा या तिरोडा-गोरेगाव विधानसभा, मोरगाव-अर्जुनी विधानसभा आणि साकोली विधानसभा या क्षेत्राला लागून आहेत; पण या आमदारांकडून या प्रकल्पासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.
रोजगाराचा मोठा प्रश्न सुटेल"नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मुरदोली गेटला सुरू केल्यास परिसरातील अनेक गावांतील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. मुरदोली हे गेट मुख्य मार्गावर असल्याने यात पर्यटकांची संख्याही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात मुरदोली गेट सुरू झाल्यास नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देतील."- सोनम येडेकर, पर्यावरणप्रेमी गोरेगाव