गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी भंडाऱ्यावरून नागपूरकडे प्रवास करत असताना अपघातातून थोडक्यात बचावले. नागपूरजवळ वडोदा परिसरात, हल्दीराम कंपनीसमोर कार आणि ट्रकची धडक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि खासदार पडोळे सुरक्षित आहेत. ते दिल्ली येथे अधिवेशनासाठी रवाना होत असताना हा अपघात घडला.
खासदार पडोळे यांच्या कार्यालयीन सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भंडाराहून पहाटे ५ वाजता ते वाहनाने निघाले होते. वाहनामध्ये चालक राहुल गिरीपुंजे, खडसे नामक बॉडीगार्ड आणि भंडारा येथील देवेंद्र उर्फ अप्पू शहारे हे व्यक्ती होते. मौदा ते वडोदा या दरम्यान समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने खासदारांचे वाहन ट्रकवर जाऊन आदळले. यामुळे पुढील भाग मोठ्या प्रमाणावर क्षतीग्रस्त झाला. यात खासदार पडोळे आणि देवेंद्र शहारे यांच्या पायाला दुखापत झाली. या अपघाताची नोंद वडोदा येथील पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. अपघातानंतर खासदार पडोळे सात वाजताच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले, तर देवेंद्र शहारे यांच्यावर वडोदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, याच मार्गावर त्यांच्या वाहनाचा हा तिसरा अपघात असल्याने या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. या घटनेनंतर कार्यकर्ते व नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून, खासदारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, यापूर्वी ११ सप्टेंबर २०२५ रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान मतदान आटोपून परत येताना पहाटे त्यांच्या वाहनाला अपघात घडला होता. खासदार पडोळे यांच्या ताफ्यामध्ये पायलट वाहन नाही. यापूर्वी झालेल्या अपघातानंतर त्यांनी पायलट वाहनाची मागणी केली होती. मात्र ती दुर्लक्षित ठरली. आज पुन्हा झालेल्या अपघातानंतर रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे.
Web Summary : MP Prashant Padole narrowly escaped injury when a truck hit his vehicle near Nagpur. Fortunately, no one was hurt. This is the third accident on the same route, raising concerns about road safety. Demands are rising for immediate safety measures.
Web Summary : सांसद प्रशांत पडोले नागपुर के पास ट्रक की टक्कर में बाल-बाल बचे। सौभाग्य से, कोई घायल नहीं हुआ। यह उसी मार्ग पर तीसरी दुर्घटना है, जिससे सड़क सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है। तत्काल सुरक्षा उपायों की मांग बढ़ रही है।