वीज कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST2021-05-17T04:27:29+5:302021-05-17T04:27:29+5:30

गोंदिया : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण व्यवस्थेतील वीज कामगार, कर्मचारी, अभियंता यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करावे तसेच इतर सोयी ...

Movement of power workers, employees, officers | वीज कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आंदोलन

वीज कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आंदोलन

गोंदिया : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण व्यवस्थेतील वीज कामगार, कर्मचारी, अभियंता यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करावे तसेच इतर सोयी सुविधा देण्यात याव्या, या मागणीला घेऊन संपूर्ण राज्यात येत्या १७ मे रोजी आंदोलन करणार आहेत.

महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांतील कामगार, अभियंते व अधिकारी तसेच कंत्राटी, आऊट सोर्सिंग कामगार व सुरक्षा-रक्षक कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव तिन्ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी ऊर्जा विभागास एक महिन्यापूर्वी पाठविला. त्यानंतर आरोग्य विभागानेही त्याला मंजुरी दिली, मात्र शासनस्तरावर अद्यापही हा निर्णय झालेला नाही. गेल्या मार्चपासून तिन्ही कंपन्यांतील चारशेच्या वर कामगार मृत्यू पावले असून हजारो कामगार बाधित झालेले आहेत. त्यातच या कर्मचाऱ्यांसाठी असलेली मुदतीची अवधी ही १४ मे रोजी संपली आहे. मेडिक्लेमला मुदतवाढ देण्यासाठी फाईल ऊर्जामंत्र्यांकडे आहे. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. लॉकडाऊन काळात सर्व हॉस्पिटल, कोविड सेंटर, पाणी पुरवठा, दिवाबत्ती इत्यादी उपकरणे सुरु आहेत. भर उन्हाळ्यात वीज पुरवठा सुरळीत आहे. महावितरण कंपनीचे अध्यक्ष व कामगार संघटना पदाधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून वीज कामगार यांना प्रथम लस उपलब्ध देण्याची मागणी केलेली आहे. तेव्हा शासनाचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १७ मे रोजी दिवसभर सर्व केंद्रीय, झोनल, सर्कल, विभागीय व शाखा सचिवांनी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे असे आवाहन विद्युत कामगार, कर्मचारी, अभियंत्यांनी केले आहे.

Web Title: Movement of power workers, employees, officers