शाळाबाह्य बालकांच्या शोधासाठी ‘मिशन वीटभट्टी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST2021-02-06T05:00:00+5:302021-02-06T05:00:22+5:30
सध्या वीटभट्टीचे काम सुरू असून या वीटभट्टींवर शाळाबाह्य बालके असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी ९ व १० फेब्रुवारी या दोन दिवशी ‘मिशन वीटभट्टी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. वीटभट्टीवर ६ ते १४ वर्षे वयोगटातील (दिव्यांग बालक असल्यास १८ वयोगटापर्यंत) शाळाबाह्य बालक असल्यास त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याकरिता सर्वप्रथम तालुक्यातील तहसील कार्यालयातून वीटभट्ट्यांची माहिती घेण्यात यावी. जेणेकरून एकही वीटभट्टी शोधमोहिमेमधून सुटणार नाही.

शाळाबाह्य बालकांच्या शोधासाठी ‘मिशन वीटभट्टी’
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही सद्य:स्थितीत १०० टक्के मुले अनेक कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता शिक्षण विभागाने ‘मिशन वीटभट्टी’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
सध्या वीटभट्टीचे काम सुरू असून या वीटभट्टींवर शाळाबाह्य बालके असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी ९ व १० फेब्रुवारी या दोन दिवशी ‘मिशन वीटभट्टी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. वीटभट्टीवर ६ ते १४ वर्षे वयोगटातील (दिव्यांग बालक असल्यास १८ वयोगटापर्यंत) शाळाबाह्य बालक असल्यास त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याकरिता सर्वप्रथम तालुक्यातील तहसील कार्यालयातून वीटभट्ट्यांची माहिती घेण्यात यावी. जेणेकरून एकही वीटभट्टी शोधमोहिमेमधून सुटणार नाही. ११ व १२ फेब्रुवारी या दोन दिवसांत शाळाबाह्य मुले (कधीच शाळेत न गेलेले हे विद्यार्थी, सतत तीस दिवस गैरहजर बालक, शिक्षणात मध्येच खंड पडलेले) स्थलांतरित, ड्राप बॉक्समधील बालकांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. बालकांचा शोध घेताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत:ची आरोग्यविषयक काळजी घेऊन शाळाबाह्य बालकांना दाखल करण्यात येणार आहे.
९ ते १२ फेब्रुवारी रोजी शोधमोहीम बालरक्षक, शिक्षक, विषय साधनव्यक्ती, समावेशीत विशेषज्ज्ञ, विशेष शिक्षकांमार्फत करावयाची आहे. एकही शाळाबाह्य बालक राहणार नाही याकरिता ३ दिवसीय शोधमोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. शाळाबाह्य बालकांची माहिती मिळावी यासाठी दगडखाण, वीटभट्टी, अस्थायी, भटके कुटुंब, बांधकाम, रेड लाईट एरिया व तत्सम तसेच भीक मागणारे कुटुंब, रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी शोधमाेहीम राबविण्यात येणार आहे.
ड्राॅप बॉक्समध्ये आहेत बालके
बालरक्षक, शिक्षक, विषय साधनव्यक्ती, समावेशीत विशेषज्ज्ञ, विशेष शिक्षक यांच्यामार्फत शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची कारवाई करून याबाबतची माहिती सरल प्रणालीत शाळास्तरावर अद्ययावत होण्यासाठी केंद्र प्रमुखामार्फत पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने ९ ते ११ नोव्हेंबर २०२० रोजी शोधमोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये ५० शाळाबाह्य बालके आढळली. ड्राॅप बॉक्समध्ये अजूनही पेंडिंग फॉर रिक्वेस्ट आणि पेंडिंग फॉर अप्रुवल संख्या दिसत आहे.
मिळेल आधार कार्ड
शोधमोहिमेमध्ये आढळलेल्या शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना तत्काळ नियमित शाळेत दाखल करून ज्या बालकांचे आधार कार्ड नाही त्यांचे आधार कार्ड काढण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील कधीच शाळेत न गेलेल्या व मध्येच शाळा सोडलेल्या (ईवन व ईटू) बालकांची माहिती संकलित करावयाची आहे. ड्राॅपबॉक्स २०१७-१८ ते २०२०-२१ मधील बालकांचा शोध घेऊन पेंडिंग फॉर अप्रुवल आणि पेंडिंग फॉर रिक्वेस्ट निरंक करावयाचे आहे.