स्थलांतरीत मजुरांमुळे कोरोना दारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:26+5:30

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. यामुळे देशभराततील उद्योगधंदे बंद पडले व याचा थेट फटका मजूर वर्गावर पडला. हाताला काम राहिले अशात मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. प्रवासाची सुविधा नसल्याने मजुरांनी पायी प्रवास सुरू केला.

Migrant laborers at the Corona door | स्थलांतरीत मजुरांमुळे कोरोना दारावर

स्थलांतरीत मजुरांमुळे कोरोना दारावर

ठळक मुद्देतालुक्यात हजारो मजूर परतले । विलगीकरण कक्षात राहण्यास नकार

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ‘लॉकडाऊन’मुळे मोठ्या शहरांतून पायी प्रवास करीत आपल्या गावी परत येणाऱ्या स्थलांतरीत मजुरांनी गावातील विलगीकरण कक्षात न थांबता थेट घरातच मुक्काम केला आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सुद्धा पालन ते करीत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग दार ठोठावत असल्याची भीती निर्माण झाली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून देश ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. यामुळे देशभराततील उद्योगधंदे बंद पडले व याचा थेट फटका मजूर वर्गावर पडला. हाताला काम राहिले अशात मजुरांनी आपल्या घरची वाट धरली. प्रवासाची सुविधा नसल्याने मजुरांनी पायी प्रवास सुरू केला. रस्त्यात एखादे वाहन मिळाले तर काही अंतर त्यातून तर कधी पायी चालत असे करीत त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला व आता आपल्या मूळ गावी पोहचू लागले आहेत. कित्येकांचा प्रवास सुरूच असून ते देखील पोहचतील. परंतु गावात पोहोचणारे मजूर गावाबाहेर विलगीकरण कक्षात न थांबता थेट आपल्या घरी दाखल होत आहेत.
त्यातही ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन न करता घरातील लोकांमध्ये मिसळून राहत आहेत. त्यामुळे गावातील अन्य लोक मानसिकरित्या दहशतीत जगत आहेत. तालुक्यातील ग्राम बिंझली, कावराबांध, गोवारीटोला, बाम्हणटोला, पोवारीटोला, नवेगाव, बाम्हणी, सोनपुरी, पानगाव, मुंडीपार, रोंढा, निंबा, पिपरीया या व इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मजूर गावात परतले आहेत. १-२ गावांत सरपंच व पोलीस पाटलांच्या सूचनेला मान देऊन काही जण विलगीकरण कक्षात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु ९० टक्के गावांमध्ये हे मजूर आपल्या मर्जीप्रमाणे वागत गावांमध्ये बिनधास्त फिरत आहेत.

विलगीकरण कक्षात राहण्यासाठी अटी
स्थलांतरीत मजुरांना जेव्हा विलगीकरण कक्षात राहण्यासाठी विनंती केली जाते तेव्हा ते राहण्यासाठी अटी-शर्ती मांडतात. दिवसातून ३ वेळा जेवण,चहा-नाश्ता, पाणी, साबण, ब्रश,पेस्ट व इतर दैनंदिन वस्तूंची पूर्तता नित्याने करावी तेव्हाच आम्ही विलगीकरण कक्षात राहू अशी अट मांडून आग्रह करणाºया सरपंच व पोलीस पाटलांना नि:शब्द करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे, हे मजूर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, हैदराबाद आदि ‘रेड झोन’ मधील शहरांतून आल्याने हे धोकादायक आहे.

Web Title: Migrant laborers at the Corona door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.