शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:50 IST2019-02-28T00:49:19+5:302019-02-28T00:50:45+5:30
तालुक्यातील कमरगाव येथील शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. या मागणीला घेवून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने बुधवारी (दि.२७) शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळा पूर्ववत उघडण्यात आली.

शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील कमरगाव येथील शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. या मागणीला घेवून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने बुधवारी (दि.२७) शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळा पूर्ववत उघडण्यात आली.
गोरेगांव तालुक्यात एकूण जिल्हा परिषदेच्या एकूण १०९ शाळा आहेत. यामध्ये १ हायस्कूल, ४८ वरिष्ठ प्राथमिक शाळा, ६० प्राथमिक शाळा आहेत. या शाळेत ४४६ शिक्षकांची गरज आहे. यापैकी २३ शिक्षकांची पदे भरलीे नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील दोन शाळांना पालक व शालेय व्यवस्थापन समितीने कुलूप ठोकल्यानंतर विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (दि.२७) कमरगाव येथील पालक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शिक्षकाच्या मागणीला घेवून शाळेला कुलूप ठोकले. गटशिक्षणाधीकारी महेंद्र लांडे यांना पालकांनी शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच त्यांनी भंडगा शाळेत कार्यरत शिक्षक सिध्दार्थ भोतमांगे यांची कमरगाव शाळेत नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेत शाळा पूर्ववत उघडली.
विशेष म्हणजे भोतमांगे हे सुध्दा महिनाभरानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या शाळेत पुन्हा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कमरगांव वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग असून १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या शाळेत ५ शिक्षक कार्यरत आहेत. परंतु एका शिक्षकाची गरज आहे. एका शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने पंचायत समिती शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.
कुलूप ठोका, शिक्षक मिळवा
गोरेगाव तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यात यावी. यासाठी पालक व शालेय व्यवस्थापन समितीने अनेकदा शिक्षणाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. पालक व शालेय व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकताच शिक्षकाची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे शाळेला कुलूप ठोका आणि शिक्षक मिळावा असेच चित्र जिल्ह्यात आहे.
शिक्षक भरती झाली नाही त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. कमरगांव शाळेतील शिक्षक कवळीटोला येथे शैक्षणिक कार्याकरीता पाठविल्याने ही अडचण निर्माण झाली. या ठिकाणी शिक्षक देणार असे गटशिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिले आहे.
-आर.एल.मांढरे, शिक्षण विस्तार अधिकारी गोरेगांव