बिबट्याने घेतला चार वर्षीय चिमुकल्याचा बळी; खडकी-डोंगरगाव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:30 IST2026-01-10T13:25:32+5:302026-01-10T13:30:49+5:30
Gondia : घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसून असलेल्या चार वर्षीय चिमुकल्याला अचानकच झडप घालून बिबट्याने उचलून नेले. तिरोडा तालुक्यातील ग्राम खडकी-डोंगरगाव येथे शुक्रवारी (दि.९) सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

Leopard kills four-year-old child; Incident in Khadki-Dongargaon
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम (गोंदिया) : घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसून असलेल्या चार वर्षीय चिमुकल्याला अचानकच झडप घालून बिबट्याने उचलून नेले. तिरोडा तालुक्यातील ग्राम खडकी-डोंगरगाव येथे शुक्रवारी (दि.९) सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी बिबट्याचा शोध घेतला असता चिमुकल्याचा मृतदेह मिळाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून गावकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हियांशला त्याची आई घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसून मुरमुऱ्याचा लाडू खाऊ घालत होती. त्याच वेळी दवा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करीत हियांशला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळाने हियांशचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून वनविभागाबाबात रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, घटना घडल्यावरही वनविभाग व पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
खडकी व परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला असून याआधीही अनेकदा ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रार केली आहे. मात्र, वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्याने आता एका निष्पाप जीवाला प्राण गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, पीडित कुटुंबाला तत्काळ मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शेजारच्या घरातून बोकड नेला उचलून
हियांशचा मृतदेह मिळाल्या नंतर समस्त गावकरी रहांगडाले यांच्या घरात गोळा झाले असता त्याचवेळी सकाळी सुमारे १०:३० वाजता बिबट्याने रहांगडाले राहत असलेल्या परिसरातील प्रभू कटरे यांच्या घरातील अंगणात बांधून असलेला बोकड उचलून नेला. हे बघून गावकरी धावले असता बिबट त्यांच्यावर चवताळत होता अशी माहिती आहे.