लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयासाठी पाच एकर जागेचा प्रस्ताव आहे. त्या ठिकाणी दहा एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. अशी जागा शहरात उपलब्ध नाही. मात्र, शहरालगत असलेल्या फुलचूर व झुडपी जंगलाच्या जागेचा विचार केला जात आहे. या दोन पर्यायी जागांसाठी प्रयत्न सुरू असून, जागेचा प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत गोंदिया जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयाबाबत आ. अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिले. केंद्रीय महाविद्यालयासाठी गोंदिया शहरात पाच एकर जागा उपलब्ध नसली तरी दोन पर्यायी जागा विचाराधीन आहेत. यात मौजा फुलचूर येथे ४.१५ हेक्टर आणि १.४१ हेक्टर इतक्या दोन मोठ्या जागा उपलब्ध आहे. झुडपी जंगल क्षेत्र असलेल्या या जागा शासनाच्या परवानगीने वापरण्याचा पर्याय तपासला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात जागेचा शोध घेतला असता महसूल विभागाच्या तपासणीत शहरालगत आवश्यक जमीन उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, झुडपी जंगल क्षेत्रातून जागा मिळू शकते का यावर सध्या सरकार विचार करीत आहे. सुप्रीम कोर्टात झुडपी जंगल क्षेत्राच्या वापराबाबत राज्य सरकारने अंतिम सबमिशन केले आहे आणि त्यावर तातडीने परवानगी मिळण्याची शक्यता आहे. जर ही परवानगी मिळाली, तर शहरालगतच असलेल्या दोन भूखंडामधून एक जागा यासाठी निश्चित केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना होणार सोयीचेनवेगावबांध येथे केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेले नवोदय विद्यालय सुरू आहे. त्यातच आता नवे केंद्रीय विद्यालय मिळाल्याने खेड्या पाड्यातीलच नव्हे, तर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना महागड्या सीबीएसईच्या शाळांऐवजी शासनाच्याच शाळेतून कमी पैशात सीबीएसईचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.
सुसज्ज व्यायामशाळेसह प्रयोगशाळानव्याने सुरू होणाऱ्या केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यासांठी सुसज्ज व्यायामशाळा राहणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतसाठी एक, सहा ते दहावीपर्यंतसाठी एक आणि अकरावी ते बारावीसाठी एक, अशा तीन स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा राहणार आहेत. आरटीईमधील प्रवेश घेतलेल्या मुलांना निःशुल्क शिक्षण मिळेल, तर बीपीएलमधील मुलांना नाममात्र प्रवेश शुल्क लागणार आहे. या केंद्रीय विद्यालयासाठी मानव संसाधन व मनुष्यबळ मंत्रालयांतर्गत नोकरभरती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गोंदिया येथे केंद्रीय विद्यालय सुरु झाल्यास विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
तीन वर्षांपासून सुरू आहे जागेचा शोधकेंद्र सरकारच्या मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने देशातील १५० जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय तीन वर्षांपूर्वी मंजूर केले होते. यात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश होता. या केंद्रीय विद्यालयात शासकीय नोकरदारापासून ते सर्वसामान्यांच्या मुलांना प्रवेश मिळणार आहे. भंडारा येथील जवाहरनगर स्थित केंद्रीय विद्यालयाचे प्रशासन कार्यान्वित झाले असून, गोंदिया येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी १० एकर जागेचा शोध सुरू झाला आहे. नक्षलग्रस्त, आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यासाठी हे विद्यालय सेमीअर्बन म्हणून मंजूर झाले आहे.
जागेची केली होती पाहणीगोंदिया येथे हे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी भंडारा येथील जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य महिपाल आणि त्यांच्या चमूने गुरुवारी गोंदिया येथे येऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती.