जय सेवा-जय जय सेवाच्या गजराने कचारगड दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:13+5:30
कोया पुनेम पूजेसाठी देशाच्या विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल झाले आहे. शनिवारी (दि.८) सकाळी ११ वाजता गोंडराजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते गोंडी धर्माचा सप्तरंगी झेंडा फडकाविण्यात आला. केंद्रीय पोलाद राज्य मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते गोंडवाना साम्राज्य झंडा फडकाविण्यात आला. कोया पुनेम महोत्सव व गड महारॅलीचा प्रारंभ करुन शंभूसेकची पालखी गडावर नेण्यात आली.

जय सेवा-जय जय सेवाच्या गजराने कचारगड दुमदुमले
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कचारगडला येथे कोयापुनेम महोत्सवाला सुरुवात झाली.कचारगड परिसर जयसेवा-जय जय सेवाच्या गजराने दुमदुमले. कोया पुनेम पूजेसाठी देशाच्या विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल झाले आहे.
शनिवारी (दि.८) सकाळी ११ वाजता गोंडराजे वासुदेव शाह टेकाम यांच्या हस्ते गोंडी धर्माचा सप्तरंगी झेंडा फडकाविण्यात आला. केंद्रीय पोलाद राज्य मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते गोंडवाना साम्राज्य झंडा फडकाविण्यात आला. कोया पुनेम महोत्सव व गड महारॅलीचा प्रारंभ करुन शंभूसेकची पालखी गडावर नेण्यात आली.
या वेळी पिवळ्या रंगाचा फेटा घातलेले व पिवळा दुप्पट्टा गळ्यात घातलेले लाखो गोंडी समाजबांधव रॅलीत सहभागी झाले. या दरम्यान धनेगाव ते कचारगडपर्यंत चार कि.मी.च्या परिसरात जय सेवा, जय जय सेवा, जंगो माता की जय, लिंगो बाबा की जय व गोंडी भाषेत इतर जयघोषाचा गजराने अख्खा परिसर दुमदुमला.
त्यापूर्वी सकाळी गोंडी भूमकाल (पुजारी) यांनी गोंडी परंपरेनुसार पूजन विधी पार पाडली व कार्यक्रमाला विधीवत सुरुवात केली. या वेळी गोंडी संस्कृती, सल्ला-गांगरा, शक्तीचे रचनाकार पहांदी पारी कुपार लिंगो, रायताड जंगो, शंभू- गौरा, संगीत संम्राट हिरासुका पाटालोर, ३३ कोट संगापेन आणि १२ पेनचे ७५० गणगोत या सगळ्यांचे स्मरण करीत आपली श्रद्धा व्यक्त केली. या वेळी गोंडवाना रत्नदादा हिरासिंह मरकाम गोंडी पूनेमी प्रचारक शितलसिंह मरकाम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय पुराम होते. या वेळी खा. अशोक नेते यांच्यासह देशाच्या अनेक राज्यातून आलेले मान्यवर नेते मंडळी उपस्थित होती.
समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, उपाध्यक्ष रमणलाल सलाम, मनिष पुसाम, बारेलाल वरखडे, गुणवंत बिसेन, शंकर मडावी आणि स्थानिय मान्यवर मंडळीसुद्धा सहभागी झाले. कार्यक्रमामध्ये कोया पुनेम महोत्सवानिमित्त गोंडी संस्कृती, गोंडी नृत्य, गोंडी वेशभूषा, गोंडी साहित्य, गोंडी वाद्य आदीचे दर्शन घडून आले. या वेळी राष्ट्रीय गोंडी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन सुद्धा केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी गोंडी समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या समूहाने आपले आदिवासी नृत्य सादर करुन भाविकांना मंत्रमुग्ध करीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
आदिवासी संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज : फग्गनसिंह कुलस्ते
आदिवासी संस्कृती भारतातीलच नाही तर जगातील सर्वात जुनी संस्कृती असून या संस्कृतीला टिकवून ठेवण्याची गरज आहे. आपल्या या संस्कृतीने खरे जीवन जगण्याचे दर्शन होते. त्यामुळे प्रत्येक समाज बांधवाने आदिवासी गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी व त्यांची जपणूक करण्यासाठी एक मोलाचे सहकार्य करीत समर्पण भावनेने कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय,पोलाद राज्यमंत्री फगनसिंह कुलस्ते यांनी केले.