'हायड्रोपोनिक' गांजाचा नवीन प्रकार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होतेय तस्करी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:54 IST2025-09-12T19:52:49+5:302025-09-12T19:54:13+5:30
Gondia : गांजाचे व्यसन लागल्यामुळे तरुणांचे करिअर खराब होते आणि ते गुन्हेगारीकडे वळतात. जिल्ह्यात गांजा बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम वेळोवेळी राबविली जात आहे.

Is a new type of 'hydroponic' cannabis being smuggled on online platforms?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात अमली पदार्थांचे (ड्रग्ज) पेव वाढत असताना, पुणे पोलिसांनी १० कोटी रुपयांचा 'हायड्रोपोनिक' गांजा जप्त करत अमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही वर्षात अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ झाली असून, यात 'हायड्रोपोनिक' गांजा हा नवा आणि धोकादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून या गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाण्याची शक्यता आहे.
गांजाचे व्यसन लागल्यामुळे तरुणांचे करिअर खराब होते आणि ते गुन्हेगारीकडे वळतात. जिल्ह्यात गांजा बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम वेळोवेळी राबविली जात आहे.
कारवाई आणि दंडाची काय तरतूद ?
अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ अर्थात एनडीपीएस कायद्यानुसार, गांजा बाळगणे, उत्पादन करणे किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. या कायद्यानुसार, दोषी आढळल्यास १० ते २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक ते दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मोठ्या प्रमाणावर गांजा बाळगल्यास कठोर शिक्षा होते.
गांजाचे शरीरावर दुष्परिणाम
गांजाचे सेवन केल्याने अनेक दुष्परिणाम होतात. यामुळे मेंदूवर परिणाम होतो, स्मरणशक्ती कमी होते आणि एकाग्रता बिघडते. सतत सेवन केल्याने व्यसन लागते आणि मानसिक आरोग्य बिघडते. फुफ्फुसांचे विकार, हृदयविकार आणि पचनसंस्थेवरही गांजाचा नकारात्मक परिणाम होतो.
हायड्रो गांजाला मोठा भाव
'हायड्रोपोनिक' गांजाची मागणी अधिक असल्यामुळे त्याला जास्त भाव मिळतो. साध्या गांजाच्या तुलनेत याचे दर पाच ते दहापटीने जास्त असतात. त्यामुळे अमली पदार्थ तस्कर अधिक नफा कमावण्यासाठी या प्रकारच्या गांजाची निर्मिती आणि विक्री करतात.
परदेशातून मोठ्या प्रमाणात तस्करी
पुण्यात जप्त केलेला गांजा परदेशातून आणलेला असल्याचा संशय आहे. यापूर्वी काही शहरांमध्येही 'हायड्रोपोनिक' गांजा पकडला गेला आहे. परदेशात, विशेषतः युरोपात अशाप्रकारे गांजा उगवण्याचे प्रकार सर्रास चालतात.
जिल्ह्यात किती पकडला गांजा
जिल्ह्यात अद्याप हायड्रोपोनिक गांजाचा प्रकार समोर आलेला नाही. मात्र, पोलिसांनी यापूर्वी गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई करत कित्येक गुन्हे नोंदवले आहेत. लगतच्या छत्तीसगड राज्यातून गांजाची तस्करी होत असल्याचे कारवायांतून दिसून आले आहे. शिवाय, रेल्वेतूनही गांजा वाहतूक करणाऱ्यांना पकडले आहे.
माती, सूर्यप्रकाशाविना बंद खोलीत उगवतात झाडे
'हायड्रोपोनिक' गांजा उगवण्यासाठी माती आणि सूर्यप्रकाशाची गरज नसते. बंद खोली, गोदामात किंवा घरातच कृत्रिम प्रकाश आणि पंखे वापरून गांजाची झाडे वाढवली जातात.
काय आहे हायड्रोपोनिक गांजा ?
'हायड्रोपोनिक' गांजा हा एका विशेष पद्धतीने उगवलेला गांजा आहे. यात मातीचा वापर केला जात नाही. त्याऐवजी, पाण्याच्या सहाय्याने वनस्पतींना वाढवण्यासाठी आवश्यक पोषक द्रव्ये दिली जातात. त्यामुळे याला 'हायड्रोपोनिक्स' पद्धत म्हणतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून गांजा बंद खोलीत, कृत्रिम प्रकाश आणि नियंत्रित तापमानात उगवला जातो. यामुळे त्याचा वास येत नाही आणि तो सहजासहजी ओळखता येत नाही.