४ पदे रिक्त असताना १४ पदे भरलीच कशी? चंद्रमणी बुद्ध विहार समिती शिक्षण संस्थेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:25 IST2026-02-20T19:24:39+5:302026-02-20T19:25:35+5:30
Gondia : महेंद्र मेश्राम हे सचिव असलेल्या चंद्रमणी बुद्ध विहार समिती या शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या नियुक्तींमध्ये बोगसपणा झाला आहे.

How come 14 posts were filled when 4 posts were vacant? Types of Chandramani Buddha Vihar Samiti Educational Institution
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महेंद्र मेश्राम हे सचिव असलेल्या चंद्रमणी बुद्ध विहार समिती या शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या नियुक्तींमध्ये बोगसपणा झाला आहे. या संस्थेच्या चार शाळा असून, चारही शाळांत २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधी १४ शिक्षकांची अवैध पद्धतीने नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या चारही शाळांची संचमान्यता तपासली असता, केवळ ४ पदे रिक्त असताना १४ पदे भरलीच कशी आणि गोंदियाचे शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी मंजुरी देऊन शिक्षकांचे वेतन कसे सुरू केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी सदर पोलिस ठाणे, नागपूर येथे तपास सुरू असून, गोंदिया जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे. चंद्रमणी बुद्ध विहार समिती या संस्थेच्या जिल्ह्यात अमृताबेन इंदिराबेन पटेल विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, सरकाटोला, मिलिंद विद्यालय गोरठा व बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला या शाळा आहेत. या शाळांमध्ये १४ शिक्षकांना सहायक शिक्षक म्हणून शिक्षण विभागाने मान्यता प्रदान केली आहे. संस्थेने सहायक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी खोटी व बनावट संचमान्यता तयार करून विद्यार्थ्यांची संख्या मोठी दाखवून नियुक्त्या केल्याचा आरोप आहे. संस्थेच्या शाळेतील संचमान्यतेचे अवलोकन केले असता, शिक्षक पदासाठी वर्ग नववी ते दहावीसाठी ३ पद रिक्त असताना मोठ्या प्रमाणात शासकीय वेतनात शिक्षक भरती करण्यात आली. वर्ग ६ ते ८ साठी शिक्षक पात्रता टीईटी असल्यामुळे वर्ग ९ ते १० साठी शिक्षकांची नेमणूक करून शासनाचे आर्थिक नुकसान करण्यात आले.
संस्थेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
यासंदर्भात चंद्रमणी बुद्ध विहार समिती शिक्षण संस्थेचे सचिव महेंद्र मेश्राम यांना विचारणा केली असता या सर्व नियुक्त्या या तत्कालीन मुख्याध्यापक यांनी मला आणि संचालक मंडळाला अंधारात ठेवून केल्या आहेत. यासंदर्भात न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे. संस्थेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसुद्धा स्वतंत्र प्रमाणपत्राच्या आधारावर करण्यात आल्या आहेत. यात कुठेही नियमाचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. तत्कालीन मुख्याध्यापक आणि काहींनी संस्थेला हेतुपुरस्पर बदनाम करून अडचणीत आणण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचे महेंद्र मेश्राम यांनी सांगितले.
एकाच अनुकंपाच्या आधारे २ परिचराची पदभरती
संस्थेमध्ये चंद्रकुमार मेश्राम, आशिष कांबळे व अमित रंगारी यांना परिचर पदासाठी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. मात्र, यातील दोन परिचरांसाठी एकच अनुकंपा प्रमाणपत्र वापरण्यात आले आहे.
लिपिकाला बनविले शिक्षक
संस्थेच्या मिलिंद विद्यालय, गोरठा येथे लोकचंद ग्यानीराम हेमने यांची नियुक्ती १२ जुलै २०२४ रोजी शिक्षण सेवक म्हणून दाखविली आहे; परंतु हेमने हे त्याच संस्थेवर अनेक वर्षांपासून लिपिकाचे कार्य करीत होते. त्यांच्या डिग्रीवर सुद्धा तक्रारीत शंका उपस्थित केली आहे.