नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
By अंकुश गुंडावार | Updated: November 20, 2025 12:27 IST2025-11-20T12:26:40+5:302025-11-20T12:27:05+5:30
Encounter With Naxalites: महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कंघुराच्या जंगलात शोधमोहिम राबवित असतांना बुधवारी (दि.१९) सुमारास हाॅकफोर्स व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मध्यप्रदेश हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा शहिद झाल्याची घटना घडली.

नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
गोंदिया - महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कंघुराच्या जंगलात शोधमोहिम राबवित असतांना बुधवारी (दि.१९) सुमारास हाॅकफोर्स व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मध्यप्रदेश हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा शहिद झाल्याची घटना घडली.
एमएमसी (महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड) झोनमध्ये माओवादी असल्याची गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर सीमेवर मध्यप्रदेश व छत्तीसगड पोलिसांच्यावतीने सीमेवरील बोरतलाव भागाला लागून असलेल्या कांगुराच्या घनदाट जंगलात संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली होती. त्या मोहिमेचे नेतृत्व शर्मा करीत होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या २०-२५ च्या संख्येतील माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. त्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना माओवाद्याकडून झालेल्या गोळीबारात पोलीस उपनिरिक्षक शर्मा जखमी झाले. तेव्हा लगेच त्यांना डोंगरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
माओवाद्याने केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरिक्षक शर्मा यांच्या हात पाय व पोटावर गोळ्या लागल्याने लगेच त्यांना डोंगरगढ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती राजनादंगावचे पोलीस महानिरिक्षक अभिषेक शांडिल्य यांनी दिली. ज्या कंघुराच्या जंगलात गोळीबार झाला त्या घटनास्थळावर राजनांदगांव पोलीस अधिक्षक अंकिता शर्मा आणि लागूनच असलेल्या खैरागडचे पोलीस अधिक्षक लक्ष्य शर्मा यांनी पोचून शोधमोहिम अधिक जोमाने सुरु केली आहे.
जानेवारीत होणार होते लग्न
मध्यप्रदेशातील नरसिंहपुर जिल्ह्यातील गाडरवारा तालुक्यातील बोहानी येथील आशिष शर्मा(वय ४०) रहिवासी असून त्यांना यापुर्वी दोनवेळा भारत सरकारच्यावतीने वीरता पदक मिळाले आहे. शर्मा हे २०१६ मध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून रुजू झाले होते. तर येत्या जानेवारी महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. शर्मा यांनी फेबुवारी २०२५ मध्ये बालाघाट जिल्ह्यातील रोंढा जंगलात झालेल्या नक्षल चकमकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यात तीन महिला माओवाद्यांना ठार केले होते.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शोकसंवेदना
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शहिद पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांचे बलिदान हे नक्षलमुक्तीच्या दिशेकरीता त्यांचे बलिदान हे महत्वाचे असल्याचे आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतांना म्हटले आहे.