गोंदियातील प्रवाशांना खुशखबर ! इंदूरनंतर, दिल्ली विमानसेवा लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 20:26 IST2025-09-05T20:25:07+5:302025-09-05T20:26:47+5:30
विमानसेवेला प्रतिसाद : १६ सप्टेंबरपासून गोंदियाहून बेंगलुरूलाही घेता येणार उड्डाण

Good news for Gondia passengers! After Indore, Delhi flight service will be available soon
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबरपासून गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर प्रवासी विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. तर गोंदिया-दिल्ली प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरच गोंदियाहून प्रवासी विमान सेवेला प्रारंभ होणार असून ही निश्चित जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले. यानंतर सन २०२२ मध्ये फ्लाय बिग या कंपनीने गोंदिया-इंदूर या प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरुवात केली होती. याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा वर्षभराच्या आतच बंद झाली. यानंतर गेल्या वर्षीपासून इंडिगो विमान विमानतळावरून गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती या मार्गावर कंपनीने बिरसी विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आता स्टार एअर कंपनीने या विमानतळावरून गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर १६ सप्टेंबरपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वेळापत्रकसुद्धा कंपनीने जाहीर केले आहे. पूर्वी केवळ गोंदिया-इंदूर विमानसेवा सुरू करण्यात येणार होती. पण स्टार एअर कंपनीने आता गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोंदिया-दिल्ली विमानसेवेसाठी बालघाटच्या खासदारांचा पुढाकार
- गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या दोन्ही राज्यातील प्रवाशांसाठी गोंदिया येथील विमानतळ सोयीस्कर आहे.
- त्यामुळे गोंदिया-दिल्ली या २ मार्गावर प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी बालाघाटच्या खा. भारती पारधी यांनी पुढाकार घेत केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.
- यावर केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनीसुद्धा अनुकूलता दर्शविल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच थेट गोंदियाहून दिल्लीला उड्डाण घेणे शक्य होणार असून यामुळे उद्योगाला चालना मिळण्यास मदत होईल.
असे आहे वेळापत्रक
बेंगळुरूहून दुपारी २:३० वाजता विमान इंदूरसाठी उड्डाण घेईल व सायंकाळी ४:३० वाजता इंदूरला पोहोचेल. इंदूरहून सायंकाळी ५ वाजता गोंदियासाठी उड्डाण भरेल आणि गोंदियाला सायंकाळी ५:५५ वाजता पोहोचेल. तर गोंदियाहून सायंकाळी ६:२५ वाजता इंदूरसाठी उड्डाण भरेल व सायंकाळी ७:२० वाजता इंदूरला पोहोचेल व सायंकाळी ७:५० वाजता बेंगळुरूसाठी उड्डाण भरेल व रात्री ९:४५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल.