गोंदिया-बालाघाट मार्गाचे काम संपेना ! टिप्परने मोपेडला धडक दिल्यामुळे काकूसह पुतण्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 20:19 IST2025-12-06T20:18:08+5:302025-12-06T20:19:42+5:30
बालाघाट टी पाईंटवरील घटना : तुपट कुटुंबियावर कोसळले दु:खाचे डोंगर

Gondia-Balaghat road work not completed! Aunt and nephew killed after truck hits moped
गोंदिया : भरधाव टिप्परने मोपेडला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार काकूसह चारवर्षीय पुतण्या ठार झाल्याची घटना शनिवारी (दि.६) सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास गोंदिया-बालाघाट मार्गावरील बालाघाट टी पाईंटवर घडली. संध्या मनिष तुपट (३५) रा. कांद्री ता. मोहाडी जि, भंडारा हल्ली मुक्काम अंगुर बगीचा रोड मोहबे हॉस्पीटलजवळ गोंदिया असे काकूचे तर शिवांश राजेश तुप्पट (४) रा. कांद्री ता. मोहाडी जि, भंडारा असे मृतक पुतण्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी सायंकाळी संध्या तुप्पट ह्या एमएच ३५ एयू ६९०१ या मोपेडने शिवांशला घेऊन अंगुरबगीचाकडे जात असताना बालाघाट टी पाईंटवर त्यांनी विरुध्द दिशेने त्याची मोपेड वळवित असताना भरधाव टिप्पर क्रमांक एमएच ३५ एजे ९४९७ ने जोरदार धडक दिली. यात संध्या व शिवांग गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाव घेत जखमींना त्वरित गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषीत केले. या घटनेसंदर्भात टिप्पर चालकावर रामनगगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद केल्याची माहिती रामनगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी दिली.
काकू, पुतण्याच्या मृत्यूने सारेच हळहळले
शनिवारी सायंकाळी बालाघाट टी पाईंटवर झालेल्या अपघातात काकूसह चार वर्षीय पुतण्या ठार झाला. या घटनेने तुपट कुटुंबीयावर दु:खाचे डोंगर काेसळले. तर चारवर्षीय शिवांश व काकूच्या मृत्यूने सारेच जण हळहळले.
बालाघाट टी पाईंट झाले अपघात प्रवण स्थळ
गोंदिया-बालाघाट मार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. तर या मार्गावर रेती वाहून नेणाऱ्या टिप्परची दिवसभर वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर बालाघाट टी पाईंट हे अपघात प्रवण स्थळ झाले आहे. या ठिकाणी वाहतूक शिपायी तैनात असताना सुध्दा अपघाताला आळा बसत नसल्याचे चित्र आहे.