पैसा, बंगला, गाडी द्या अन्‌ नवऱ्याला जणू विकतच घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:00 AM2021-07-25T05:00:00+5:302021-07-25T05:00:22+5:30

हुंडा मागणी करणे हा समाजाला लागलेला कलंक मिटविण्यासाठी कडक कायद्याची निर्मिती झाली असली, तरी या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा देशात सुरूच आहे. तो हुंडा पैशाच्या रूपाने किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे. हुंडा स्वीकारण्याच्या पध्दती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे. लग्न करताना नवऱ्यामुलाला जणू मुलीचे वडील हुंडा रूपाने जणू विकतच घेत आहेत. 

Give money, bungalow, car and buy it for your husband! | पैसा, बंगला, गाडी द्या अन्‌ नवऱ्याला जणू विकतच घ्या!

पैसा, बंगला, गाडी द्या अन्‌ नवऱ्याला जणू विकतच घ्या!

Next
ठळक मुद्देसाडेतीन वर्षांत १०८ तक्रारी : हुंडा पैशात नाही, तर साहित्य रूपाने घेतात

नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  समाजातील हुंडा पध्दत मोडली जावी म्हणून ६० वर्षांपूर्वी अंमलात आणलेल्या कायद्याच्या चाकोरीत आजही लोक अडकत आहेत. हुंडा मागणी करणे हा समाजाला लागलेला कलंक मिटविण्यासाठी कडक कायद्याची निर्मिती झाली असली, तरी या कायद्याला न जुमानता हुंडा मागण्याची प्रथा देशात सुरूच आहे. तो हुंडा पैशाच्या रूपाने किंवा साहित्याच्या रूपाने मागितला जात आहे. हुंडा स्वीकारण्याच्या पध्दती बदलल्या आहेत. हुंडा देण्यास मुलीचे वडील सक्षम नसले, तर त्यांच्या मुलीचे लग्न हुंड्यापायी मोडले जात आहे. लग्न करताना नवऱ्यामुलाला जणू मुलीचे वडील हुंडा रूपाने जणू विकतच घेत आहेत. 
जिल्ह्यात हुंड्याची परंपरा फारशी नसली, तरीही हुंडा मागत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. भादंविच्या कलम ४९८ अंतर्गत २०१८ मध्ये जिल्ह्यात ४४ गुन्हे, २०१९ मध्ये ३७ गुन्हे, २०२० मध्ये १२ गुन्हे, तर २०२१ मध्ये जूनपर्यंत १५ गुन्हे दाखल आहेत. 
आम्हाला हुंडा नको, असे म्हणणारी मंडळी आपल्या मुलीला दागिने करून द्या, फ्लॅट द्या, बंगला द्या, फोर व्हीलर-टू व्हीलर द्या, असे मुलीच्या वडिलांना सांगतात. पैसे किंवा साहित्याच्या रूपात हुंडा घेऊन मुलगा स्वत:ला मुलीला विकत असल्याचे चित्र समाजात पाहायला मिळत आहे.
 

अशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत...
-  मुलाला नोकरीसाठी लागणारे डोनेशन मुलीच्या वडिलांनी द्यावे, व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा पैसा मुलीच्या वडिलांनी द्यावा, बहुतांश कुटुंब मौल्यवान वस्तूंच्या रूपात हुंडा घेतात.
-  आपला मुलगा किती होतकरू आहे, हे न पाहता गोरगरिबांपासून, गर्भश्रीमंतांपर्यंत आणि अशिक्षितांपासून अगदी उच्चशिक्षितांपर्यंत हुंडा मागितला जातो. अशिक्षितांपेक्षा शिक्षित लोक जास्त हुंडा मागताना दिसतात.
-  हुंडा मागण्याचे स्वरूप बदलले आहे. लग्नात होणारा खर्च, डिजेचा खर्च, वरातीला लागणाऱ्या वाहनांचा खर्च, मंगल कार्यालयाचा खर्च मुलीच्याच वडिलांनी सांभाळून मुलाचे भविष्य घडविण्यातही हातभार लावावा, असे सांगितले जाते. 

मुलीचे आई-वडीलही जबाबदार

हुंडा मागणारा मुलगा आपल्या मुलीवर प्रेम कसे करेल, त्याला तिच्यावर नाही, तर पैशांवर प्रेम आहे, असे मुलीच्या आई-वडिलांनी समजले पाहिजे. हुंडा मागणाऱ्या मुलाला व त्याच्या कुटुंबियांना तुरुंगाची हवा दाखविणे गरजेचे आहे.         - छाया शंकरलाल नागपुरे, सामाजिक कार्यकर्ता

हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
- हुंडा म्हणून सरळ पैसे न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लाॅट, मौल्यवान दागिने मागितले जातात.
- लग्नात होणारे अवडंबर, मुलाला लग्नात लागणारा खर्चही मुलींच्याच वडिलांकडून घेतला जातो.
- लग्नात कन्यादानात झालेल्या मुलीच्या पैशांवरही सासरच्या मंडळींची नजर असते.

नवी पिढी बदलतेय....
हुंडा घेणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचा आकडा मोठा आहे. मुलीचे आई-वडील मुलगा पाहताना होतकरू आणि नोकरीवाला पाहतात; परंतु नोकरीवर लागण्यासाठी दिलेला पैसा मुलीच्या वडिलांकडून काढण्याचा अनेकांचा मानस दिसून येतो. हे आता नवीन पिढीने बदलायला हवे.
- राजू पटले 

मुलगा नोकरीवर असेल आणि व्यसनाच्या आहारी गेला असेल, तर तो काही कामाचा नाही. मुलगा शोधताना त्याचे कर्तत्व आणि योग्यता या दोन गोष्टी पुढे ठेवून निर्व्यसनी मुलांनाच मुलगी देणे लोक पसंत करीत आहेत. आता नोकरीही त्यांच्या समोर दुय्यम झाली आहे.
- प्रा. अर्चना चिंचाळकर

 

Web Title: Give money, bungalow, car and buy it for your husband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न