Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:30 AM2024-05-24T08:30:07+5:302024-05-24T09:38:37+5:30

Success Story : पत्नी घरखर्च करते म्हणून अनेकदा नातेवाईक, मित्रांनी टोमणेही मारले. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करत फक्त ध्येय गाठण्याचा विचार केला. आज संजीव यांनी आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभा केला आहे.

मेहनत करण्याची तयारी असेल आणि जिद्द असेल तर यश हे नक्कीच मिळवता येतं. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तुम्हीही हे अनेकदा ऐकलं आणि वाचलं असेल. पण त्यांना पत्नी घरखर्च करते म्हणून अनेकदा नातेवाईक, मित्रांनी टोमणेही मारले. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करत फक्त ध्येय गाठण्याचा विचार केला. ही यशोगाथा आहे संजीव बिकचंदानी (Sanjeev Bikhchandani) यांची.

त्यांना जे ध्येय गाठायचं होतं त्यात त्यांना पाठिंबा दिला तो म्हणजे त्यांच्या पत्नी सुरभी यांनी. काही वर्षांच्या मेहनतीनंतर आज त्यांनी तब्बल ५० हजार कोटींची कंपनी उभी केली. आज संजीव लोकांसाठी नोकरी तर सोधून देतच आहेत, पण त्यांच्या आयुष्याचा जोडीदार शोधायलाही मदत करत आहेत. पाहूया कसा होता नोकरी डॉट कॉम (naukri.com) आणि जीवनसाथी डॉटकॉम (jeevansathi.com) वेबसाइट चालवणाऱ्या इन्फोएज ( Info Edge) कंपनीचे मालक संजीव बिकचंदानी (Sanjeev Bikhchandani) यांचा.

एखादा व्यवसाय सुरू करणं इतकं सोपं नाही. ना व्यवसाय चालवण्याचा अनुभव ना त्याच्याशी कोणता संबंध, तरीही संजीव यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. संजीव यांनी आयआयएम अहमदाबादमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या प्रसिद्ध कंपनीत नोकरी केली.

कॉलेजमध्येच त्यांची सुरभी यांच्याशी भेट झाली. दोघांचं लग्नही झाले. सुरभीही एका चांगल्या कंपनीत कामाला होत्या. लग्नानंतर १९९० मध्ये संजीव यांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

हे त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला सांगितलं तेव्हा त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिले. सुरभी यांच्या पगारातून घरखर्च भागला आणि संजीव आपल्या कामात व्यस्त झाले. संजीव बिकचंदानी यांनी १९९० मध्ये त्यांच्या वडिलांच्या गॅरेजमध्ये सेकंड-हँड कम्प्युटर आणि जुन्या घरातील फर्निचरसह इन्फो एज(इंडिया) ची सुरुवात केली. सुरभी यांच्या पगारातून घरचा सगळा खर्च भागवणं सोपं नव्हतं, पण कठीण परिस्थितीला तोंड देण्याची दोघांची जिद्द होती. व्यवसाय सुरू करून बरीच वर्षे झाली तरी इन्कम सुरू झालं नव्हतं.

अनेकदा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी त्यांना नोकरी करण्याचा सल्ला दिला. अनेकांनी त्यांना टोमणेही मारले. परंतु याचा त्यांनी आपल्या या प्रवासावर परिणाम होऊ दिला नाही. व्यवसायाच्या उभारणीत त्यांना पत्नीचं पूर्ण सहकार्य मिळालं. दोघांचा संघर्ष तेव्हा संपला जेव्हा सात वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी नोकरी डॉट कॉम हे जॉब पोर्टल सुरू झालं.

संजीव यांनी १९९० मध्ये सुरू केलेल्या कंपनीला सात वर्षांनी फळ मिळू लागलं. बिकचंदानी यांनी १९९७ मध्ये नोकरी डॉट कॉम हे जॉब पोर्टल सुरू केलं, तेव्हाच त्यांच्या व्यवसायाला कलाटणी मिळाली. Naukri.com नं त्यांच्या व्यवसायाला नवं वळण दिलं.

त्यानंतर त्यांनी jeevasathi.com, 99acres.com, shiksha.com यांची सुरूवात झाली. या कंपन्यांनी त्यांना नफ्याबरोबरच ओळख मिळवून दिली. जसजसे काम वाढले, तसतशी त्यांनी गुंतवणूकही सुरू केली. संजीव यांनी झोमॅटो आणि पॉलिसीबाझार सारख्या कंपन्यांमध्येही भागीदारी खरेदी केली.

संजीव यांच्या कंपनी इन्फो एज इंडियाचं मार्केट कॅप आता ५७ हजार कोटी रुपयांच्या पुढे पोहोचलं आहे. रिपोर्ट्सनुसार, संजीव बिकचंदानी यांची एकूण संपत्ती २.९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आज संजीव हे नावाजलेल्या व्यक्तींमध्ये ओळखले जातात.