बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालक ठार,अंगणात लघूशंका करीत असताना घातली झडप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:42 IST2025-09-25T10:41:36+5:302025-09-25T10:42:01+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथील घटना

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालक ठार,अंगणात लघूशंका करीत असताना घातली झडप
केशोरी (गोंदिया) : अंगणात लघूशंका करीत असलेल्या पाच वर्षीय बालकावर झडप घालून त्याला फरफटत नेत त्याला ठार केल्याची घटना आज (दि.२५) पहाटे ५:३० वाजता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथे घडली. अंश प्रकाश मंडल (वय पाच वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार अंश हा गुरुवारी पहाटे ५:३० वाजता आजी अर्चना झोडू मंडल यांच्यासोबत पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घरासमोरील अंगणात लघूशंकेकरिता गेला. त्याची आजी बाथरूम मधून पाणी आणण्यासाठी गेली होती. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंशवर हल्ला करून मानेला पकडून फरकटत नेले.
अंशाच्या जोराने रडण्याचा आवाज आल्याने आजी बाहेर आली. तेव्हा तिला अंशला बिबट्या फरफटत नेत असल्याचे दिसताच ती जोराजोराने ओरडली. यानंतर शेजारील लोक धावून आले. त्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. यानंतर बिबट्याने अंशला काही अंतरावरील शेतशिवारात सोडून दिले. बिबटय़ाच्या हल्ल्यात अंश गंभीर जखमी झाल्याने गावकऱ्यांनी त्याला केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात आणत असताना वाटेतच त्या अंशचा मृत्यू झाला असावा असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी सांगितले. या घटनेची माहिती वन विभागाला व पोलीस विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी कडून देण्यात आली.
घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
पाच वर्षीय अंशवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची माहिती गावकऱ्यांना कळताच सकाळी सात वाजतापासूनच संजय नगर येथील सर्व महिला पुरुष एकत्र येऊन केशोरी- नवेगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
वडील रोजगारासाठी गुजरातमध्ये तर आई माहेरी
अंशचे वडील बुधवारी (दि.२४) रोजगारासाठी गुजरात येथे गेले. तर त्याची आई माहेरी गेली होती. अश आणि त्याची आजी हे दोघेच घरी होते.
बिबट्याला जेरबंद करा तरच आंंदोलन मागे घेवू
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याची दहशत आहे. आज या बिबटय़ाने पाच वर्षीय अंशचा बळी घेतला. यामुळे संजयनगर व परिसरातील गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. आधी नरभक्षी बिबट्याला जेरबंद करा तरच रास्ता रोको आंदोलन मागे घेवू अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती.
महिनाभरानंतरची दुसरी घटना
२९ आगस्ट रोजी इटियाडोह धरण येथे फिरायला गेलेल्या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. तर २०२४ मध्ये गोठणगाव येथे मंडई उत्सव सुरू असतानाच सायंकाळी साडेपाच वाजता अंगणात असलेल्या लहान मुलावर सुद्धा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.
बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून
संजयनगर, बोंडगाव सुरबन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. काही गावकऱ्यांनी बिबट्या दिसल्याने गावकऱ्यांना या बिबट्याचे दर्शन देखील झाले. याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. हे क्षेत्र गोठणनगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येते.