शाळेचे लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने पाचवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; गोंदिया येथील घटना
By अंकुश गुंडावार | Updated: April 11, 2026 16:42 IST2026-04-11T16:41:48+5:302026-04-11T16:42:45+5:30
Gondia : शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बाहेर पडत असलेल्या विद्यार्थिनीच्या अंगावर शाळेचे लाेखंडी गेट अंगावर कोसळल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी १ वाजताच्या सुमारास तिरोडा नगर परिषद संचालित पीएमश्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा लोधीटोला येथे घडली

Fifth grade student dies after school iron gate collapses on her; Incident in Gondia
तिरोडा (गोंदिया) : शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बाहेर पडत असलेल्या विद्यार्थिनीच्या अंगावर शाळेचे लाेखंडी गेट अंगावर कोसळल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी १ वाजताच्या सुमारास तिरोडा नगर परिषद संचालित पीएमश्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा लोधीटोला येथे घडली. निराली मनीष चाफले (वय ११ वर्षे) इयत्ता पाचवी असे प्रवेशद्वार कोसळून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार लोधीटोला येथे नगर परिषद संचालित पीएमश्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा आहे. शनिवारी दुपारी १ वाजता शाळा सुटली. यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर पडत होते. निरालीची आईसुद्धा याच शाळेत शिक्षिका आहे. निराली सुटी झाल्यानंतर आईसोबत घरी जाण्यासाठी शाळेबाहेर पडत होती. याच दरम्यान तिचा प्रवेशद्वाराला हात लागल्याने लोखंडी गेट तिच्या अंगावर पडले. यात ती गेटखाली दबल्या गेल्याने गंभीर जखमी झाली. तिची आई व शिक्षकांनी लगेच तिला बाहेर काढून तिला तिरोडा येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी गोंदिया येथे नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली असून पालकांनी नगर परिषदेच्या कामावर रोष व्यक्त केला आहे. निराली चाफले ही अत्यंत हुशार आणि गुणी विद्यार्थिनी होती. तिने राज्यस्तरीय प्रज्ञा शोध स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. नुकताच पुणे येथे तिचा गौरव करण्यात आला होता. विशेष म्हणजे सैनिक शाळेतसुद्धा तिची निवड झाली होती. तिच्या अपघाती मृत्यूमुळे शाळा परिसरासह संपूर्ण तिरोडा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
लाेखंडी गेट झाले होते जीर्ण
या शाळेचे मुख्य प्रवेशद्वार मागील काही दिवसांपासून जर्जर अवस्थेत असल्याची माहिती आहे. हा गेेट सरकविणारा होता. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेकदा या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीची मागणी पालकांनी केली होती. यासंबंधीचा प्रस्तावही नगर परिषदेकडे प्रलंबित असल्याची आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना या प्रवेशद्वापासून दूर राहण्याचे निर्देश शाळा प्रशासनाकडून देण्यात आले होते.
यापूर्वी चारदा पडले होते लोखंडी गेट
लोधीटोला येथील नगर परिषद संचालित पीएमश्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेचे लोखंडी गेट सरकविणारे असून ते जीर्ण झाले होते. यापूर्वीसुद्धा हा गेट चारदा पडले होते. तेव्हा त्यात एक जण जखमीसुद्धा झाला होता. मात्र यानंतरही नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेऊन दुरुस्ती न केल्याने गेट पडून निराली चाफले या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.