घरात वडिलांचा मृत्यू अन् मुलगा आदेश याने दिली दहावीची परीक्षा; गोंदिया जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 23:41 IST2025-02-21T23:39:50+5:302025-02-21T23:41:19+5:30

वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवीत आदेश कटरे याने परीक्षा केंद्रावर जाऊन दिली परीक्षा

Father dies at home, son Aadesh gives 10th exam; Incident in Gondia district | घरात वडिलांचा मृत्यू अन् मुलगा आदेश याने दिली दहावीची परीक्षा; गोंदिया जिल्ह्यातील घटना

घरात वडिलांचा मृत्यू अन् मुलगा आदेश याने दिली दहावीची परीक्षा; गोंदिया जिल्ह्यातील घटना

दिलीप चव्हाण

गोरेगाव (गोंदिया) : नियतीचा खेळ अजबच असतो. नियती कधी कुणाला रडवेल कुणाला हसवेल याचा नेम नाही. बापाचे छत आणि मायेची ऊब मिळते ते नशिबानेच. गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ठाणेश्वर कटरे यांचे शुक्रवारी (दि.२१) पहाटे निधन झाले. ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा आदेश हा यंदा दहावीत. आज त्याचा पहिलाच पेपर होता. अशातच आदेशाच्या वडिलांचे निधन झाल्याने तो मोठ्या धर्मसंकटात सापडला. घरात वडिलांचा मृतदेह असताना पेपर द्यायला जायचे कसे असा प्रश्न त्याच्यासमोर होता, पण आदेशने मनावर दगड ठेवत व वडिलांच्या निधनाचे दु:ख पचवीत परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली.

गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश ठाणेश्वर कटरे हा हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षण घेत आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य या सर्वांत वाट मोकळी करीत त्याची शिक्षणासाठी धडपड सुरू होती. शुक्रवारी सकाळी आदेशच्या वडिलांचे निधन झाले. शुक्रवारपासूनच दहावीची परीक्षा सुरू झाली. आदेशचा आज पहिला पेपर होता. यात त्याची पेपरची तयारी सुरू होती. मात्र, सकाळी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने कटरे यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले. सकाळी ११ वाजता आदेशचा पेपर होता. अशात पेपर द्यायला जायचे की नाही असा पेच त्याच्यासमोर निर्माण झाला. मात्र, त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने त्याला धीर दिला. यानंतर आदेशने मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर दिला. एकीकडे घरात वडिलांचा मृतदेह, तर दुसरीकडे मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर आदेशच्या हातात मराठीचा पेपर अशा द्विधा मन:स्थितीत त्याने पेपर दिला. पेपर दिल्यानंतर घरी पोहोचत वडिलांवर अंत्यसंस्कार केले. या सर्व संवेदनशील प्रसंगाचे गावकरी साक्षीदार झाले. आदेशला परीक्षेसाठी परीक्षा देण्यासाठी शिक्षक रमेश बिसेन व क्षत्रिय पवार समाज संघटनेचे सचिव मोरेश्वर चौधरी यांनी प्रोत्साहन दिले.

मोहाडीच्या सरपंचांनी केले आदेशचे सांत्वन

या घटनेची माहिती मिळताच मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र चौरागडे, माजी सरपंच धृवराज पटले व इतर ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांनी मोहाडी येथील दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट दिली. यावेळी आदेश कटरे याची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले.

Web Title: Father dies at home, son Aadesh gives 10th exam; Incident in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.